टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स आणि इनर व्हील क्लब ऑफ खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने ७ दिवसीय मोफत कृत्रिम अवयव फिटमेंट शिबिराचे उद्घाटन

भारतातील स्वयंचलित वाहनांच्या सुट्या भागांचे अग्रगण्य उत्पादक असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स समूहाने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत आज पुण्यात कृत्रिम अवयव फिटमेंट शिबिराचे आयोजन केले.

त्याचे उद्घाटन टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष श्री. अरविंद गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीज चे अध्यक्ष अरिहंत मेहता आणि संचालिका रितिका मेहता आणि इनर व्हील क्लब ऑफ खडकी, डिस्ट्रिक्ट ३१३ च्या अध्यक्षा डॉ. सुनीती गोयल याच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित होते. पुणे आणि पंचक्रोशीतील ४०० पेक्षा अधिक दिव्यांगांना या शिबिराचा लाभ होणार आहे.

जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि हालचालींवर मर्यादा असलेल्या व्यक्तींना सक्षम करण्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ खडकी आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेड यांच्या तसेच बीएमव्हीएसएस (भगवान महावीर विकलांग मदत समिती) इंदूर सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात सात दिवसांचे प्रोथेटिक्स डोनेशन शिबिर आणि कृत्रिम अवयव फिटमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर २४ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत चालणार असून ४०० हून अधिक लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व इतर साहित्य पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. संपर्क आणि कल्याणकारी योजनांसाठी ख्याती मिळविलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ या पुण्यातील दोन प्रतिष्ठित संस्थांचेही सहकार्य या शिबिराला लाभले आहे.

या उपक्रमामुळे हालचालींवर मर्यादा आलेल्या दिव्यांग व्यक्तींचे सशक्तिकरण होऊन त्यांच्या जीवनात बदल घडविण्यात मदत होईल.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष श्री. अरविंद गोयल म्हणाले, ”समाजाची परतफेड करणे हे आमच्या समूहातील प्रत्येक कंपनीच्या संस्थात्मक मूल्यांमध्ये समाविष्ट आहे. कृत्रिम अवयव बसविण्याचा कार्यक्रम हा उपजीविका आधार पुरविण्याच्या कार्यक्रमावर केंद्रित असलेला आमचा कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाचा भाग आहे.

या उपक्रमाचा विस्तार करून व्यापक जनसमूहाला अर्थपूर्ण आधार पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती ही प्रतिष्ठा व स्वातंत्र्यासह जगण्यास समर्थ झाली पाहिजे, याची सुनिश्चिती करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. यातून त्यांचे जीवनमान सुधारेल आणि समाजात वावरण्याची त्यांची योग्यता वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.

उद्घाटन सोहळ्यात शहराच्या विविध भागांतून आलेल्या अनेक लाभार्थ्यांनी आपल्यासाठी योग्य कृत्रिम अवयवांची निवड केली. उपस्थित प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार कृत्रिम अवयव देण्यात आले. हालचालीत जास्तीत जास्त सुलभता आणि आराम देण्याच्या दृष्टीने या कृत्रिम अवयवांची रचना करण्यात आलेली आहे. या शिबिरात कृत्रिम अवयव, कॅलिपर, क्रॅच आणि इतर सहाय्यक उपकरणांचे मोफत फिटिंग व वितरण करण्यात येणार आहे.

इनरव्हील क्लब ऑफ खडकी, जिल्हा ३१३ च्या अध्यक्षा डॉ. सुनीती गोयल म्हणाल्या, “समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांची सेवा व्हावी, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारी मदत विनामूल्य उपलब्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे. ही साधने आपल्याला पुढे जाण्यास मदत करणारी असली, तरी खरी शक्ती आपल्या आतून येते. इच्छाशक्ती आणि योग्य आधाराने काहीही साध्य करता येते.”

पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “या उपक्रमातून पिनॅकल इंडस्ट्रीजची सामाजिक जबाबदारी आणि सर्वसमावेशक विकासासाठी बांधिलकी अधोरेखित झाली आहे. ज्या लोकांना याची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या जीवनात याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.”

शिबिरात असलेले तज्ज्ञ तंत्रज्ञ आणि स्वयंसेवक अचूकता आणि काटेकोरता बाळगली जाईल, याची खात्री करतील, तसेच पोस्ट-फिटमेंट आणि वैयक्तिक काळजी प्रदान करतील. उच्च दर्जाचे कृत्रिम अवयव लाभार्थ्यांची हालचाल क्षमता पुन्हा मिळवून देतील आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतील.

मोफत कृत्रिम अवयव बसविण्याचे शिबिर सर्वांसाठी खुले असून लाभार्थ्यांना मदतीसाठी शिबिराच्या ठिकाणी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आणि शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी कृपया ८१२०००९९५५ किंवा ८८०५००८६१४ येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे