नवी दिल्ली : नव्या जेएन.१ मुळे (Corona Update) आरेाग्य यंत्रणा कामाला लागलेली असताना गेल्या चोवीस तासांत देशभरात कोरोनाचे नवे ७५२ रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यातला सर्वाधिक आहे. त्यापैकी ३५२ जण बरे झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४२० असून काल ही संख्या २ हजार ९९८ होती. जेएन.१ ची आतापर्यंत २३ जणांना लागण झाली आहे.
देशभरात आतपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४.५ कोटींवर पोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात असून तेथे ५६३ रुग्ण आहेत आणि दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २९७ जण बरे झाले आहेत.
तसेच राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. १९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या काळात ८ लाख ५० हजार रुग्णांची नोंद झाली आणि तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात मृत्युदर ८ टक्क्यांनी कमी झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन.१ हा आतापर्यंत ४१ देशांत पसरला आहे. फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, कॅनडा, स्वीडन येथे जेएन.१ चे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात २२ डिसेंबरपर्यंत या नव्या संसर्गाचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र त्यांच्यात किरकोळ लक्षणे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…
या प्रकारामुळे लोकांना अधिक धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. सध्याची लस जेएन.१ प्रकारावर परिणामकारक उपचार करणारी आहे, असे म्हटले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने खबरदारी घेण्याचे आणि काळजी घेण्याची सूचना केली आहे. गर्दीच्या ठिकाणी, बंद खोलीत किंवा दूषित वातावरणात मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची देखील सूचना दिली आहे.