पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. पण मतदानाला काही तास शिल्लक असताना पुण्यात घडामोडींना वेग आलाय. पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैशांचा वाटपाचा गंभीर आरोप केला आहे.
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांकडे केली आहे. यासाठी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. धंगेकर आपल्या मागणीवर ठाम आहेत. पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे.
“गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहराच्या झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये भाजपचे आजी-माजी नगरसेवक, पालकमंत्री, आमदार पैसे वाटप करत आहेत. आमची माणसं तक्रार करतात तर त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मी कलेक्टरला फोन लावला. आम्ही पुणे शहरातून पैशांची ही पाकिटं गोळा केली आहेत.
पुणे शहरात भाजपवाले नागरिकांच्या दारासमोर हजारो आणि लाखो रुपये नेत आहेत. आमच्या जनतेचे चोरलेले पैसे अशाप्रकारे वाटप केले जात आहेत. हे पैसे काही नागरिकांना देण्यात आले होते. काही नागरिकांनी हे पैसे आमच्या हातात दिले. जोपर्यंत पैसे वाटप करण्याचं थांबत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही”, अशी भूमिका रवींद्र धगेकर यांनी मांडली आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या या आरोपांनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी धंगेकर यांची तक्रार केली. यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “समोरचे भाजपचे कार्यकर्ते जे काम करत आहेत त्यांना डिस्टर्ब करायचं, त्यांना अडकवायचं ही रवींद्र धंगेकर यांची स्ट्रॅटेजी आहे.
हे आम्ही मागच्यावेळेसही बघितलं आहे. आम्ही पोलीस आयुक्तांकडे उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदानाच्या दिवशी रवींद्र धंगेकर यांचा ड्रामा हॅण्डल करावा हे सांगण्यासाठी इथे आलो आहोत. पोलीस त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.