‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क
अंताल्या (तुर्कीये) : तुर्कीयेतील अंताल्या येथे आयोजित ‘कॉप-३१’ (COP31) जागतिक हवामान परिषदेत ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (SSRF) संपादक आणि ‘महर्षी अध्यात्म विश्वविद्यालया’चे (MAV) संशोधन प्रमुख श्री. शॉन क्लार्क यांनी भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून सहभाग घेतला. या जागतिक मंचावर त्यांनी हवामान बदलाच्या समस्येवर उपाय शोधण्यात मानवी जाणिवेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत भारताचा दृष्टिकोन सादर केला.
भारताचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित भारतीय शिष्टमंडळाच्या एका विशेष कार्यक्रमातील त्यांचा सहभाग हा या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.
हवामान निधीमध्ये मानवी वर्तनालाही मिळावे स्थान
‘कोत द’इव्हॉयर २०३०’ (Côte d’Ivoire 2030) च्या ‘क्लायमेट ट्रान्झिशन टॅक्सोनॉमी’ सत्रात श्री. शॉन क्लार्क यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की, हवामान वित्तपुरवठ्यामध्ये तांत्रिक उपाययोजना आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच मानवी वर्तन, जाणीव आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रयत्नांतील गुंतवणुकीलाही महत्त्व दिले जायला हवे का?
ते म्हणाले, “हवामान वित्तपुरवठ्यासाठी अशी रूपरेषा तयार करतांना, ज्याच्या आधारे कोणते प्रकल्प आर्थिक मदतीस पात्र आहेत हे ठरवले जाते, तेव्हा आपले लक्ष केवळ तांत्रिक उपाययोजना आणि पायाभूत सुविधांच्या विकासापुरतेच मर्यादित आहे का? की आपण मानवी वर्तन, जाणीव आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या प्रयत्नांतील गुंतवणुकीचाही त्यात समावेश करत आहोत? वास्तविक हे समजून घेणे आवश्यक आहे की, हवामान बदल ही केवळ पर्यावरण किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या नाही, तर मनुष्य कसा विचार करतो, कसा वागतो आणि कसे निर्णय घेतो, याचाही तो परिणाम आहे.”

जागतिक चर्चासत्रे आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संवाद
परिषदेत श्री. शॉन क्लार्क यांनी ‘हरित – पाथवेज टू क्लायमेट पीस’ (HARIT – Pathways to Climate Peace) या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरण जाणिवेवर एमएव्ही (MAV) आणि एसएसआर्एफचे (SSRF) विचार मांडले. याशिवाय, हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यावर केंद्रित ‘वन ओशन, वन प्लॅनेट, वन फ्युचर’ यांसारख्या इतर अनेक सत्रांमध्येही त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या दरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान माल्कम टर्नबुल, इंडोनेशियाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या सचिव रोझा व्हिव्हियन रत्नावती, ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रतिनिधी, इथिओपियाचे ‘कॉप-३२’चे अध्यक्ष, तसेच ‘युएनएफसीसीसी’ (UNFCCC) आणि ‘ब्रह्मकुमारीज’च्या प्रतिनिधींशी सार्थक संवाद साधला.
प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली आणि पर्यावरणाचा समतोल
महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (SSRF) हे प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीवर (IKS) आधारित संशोधनाच्या माध्यमातून हवामान चर्चेला एक विशिष्ट दृष्टिकोन देत आहेत. त्यांच्या संशोधनानुसार, आपले विचार, कृती, आचरण आणि सामूहिक जीवनशैली आपल्या सभोवतालच्या सत्त्व (आध्यात्मिक शुद्धता) आणि रज-तम (आध्यात्मिक अशुद्धता) यांच्या प्रमाणावर परिणाम करतात. याचा थेट परिणाम पंचमहाभूते आणि पर्यावरणावर होतो. उदाहरणार्थ, वाढलेल्या रज-तमामुळे जलतत्त्वात असंतुलन निर्माण होते, जे पूर, त्सुनामी, समुद्राची वाढती पातळी आणि दुष्काळ यांसारख्या आपत्तींच्या रूपात समोर येते; तर सत्त्वगुणाची वाढ पर्यावरणातील समतोलाला चालना देते.
आपल्या ‘पर्यावरण जाणीव चळवळ – एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून’ (Environmental Consciousness Movement – A Sustainable World Begins with Inner Transformation) या चळवळीच्या माध्यमातून महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे असे मानणे आहे की, पर्यावरणाच्या चिरस्थायी रक्षणासाठी केवळ बाह्य प्रयत्न पुरेसे नाहीत, तर साधना, सदाचार आणि सात्त्विक जीवनशैलीच्या माध्यमातून आंतरिक परिवर्तन घडवून आणणेही अनिवार्य आहे.





