रात्रीच्या वेळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांकडून अटक; ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीचा शोध; २० हजारांचा मोबाईल हस्तगत

By: Editor_Manas

On: Friday, November 20, 2026 7:04 AM

Google News
Follow Us

पुणे : रात्रीच्या वेळी दुचाकीवरून येऊन नागरिकांना अडवून शिवीगाळ व मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. स. नं. २६, कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे.

येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-नगर रोडवरून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी जबरी चोरीची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि रोख २९ हजार ६०० रुपये असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. या प्रकरणी दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९ (६), ३०९ (४), १२६ (२), ३५२ आणि ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपींना तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला दिल्या होत्या. पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्री. चिलुमूला रजनिकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनील जैतापूरकर यांनीही तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार आणि संदिप जायभाये यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळासह परिसरातील एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी कलवड वस्ती, लोहगाव परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर तपास पथकाने तातडीने आरोपीच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रेहान अश्रफ शेख (वय १९) असल्याचे सांगितले. दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणून दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपीकडून फिर्यादी यांचा चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत. ही कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्री. चिलुमूला रजनिकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. केशव दिंडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शारदा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे, पोलीस अंमलदार गणेश पालवे, नटराज सुतार, शैलेश वाबळे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, प्रशांत कांबळे, संदिप जायभाये, सोमनाथ गायकवाड आणि संदिप धादवड यांनी ही कामगिरी केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 18, 2026

November 18, 2026

November 18, 2026

November 18, 2026

November 18, 2026

November 17, 2026