‘टाइप १ डायबिटीस’ रुग्णांना मिळणार विशेष उपचार; मधुमेह व बालदिनानिमित्त स्वीटलिंग्ज सेंटरतर्फे १४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान जनजागृती अभियान

By: Editor_Manas

On: Friday, November 13, 2026 2:43 PM

Google News
Follow Us
पुणे : मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे वेळीच निदान, प्रतिबंधात्मक उपाय आणि योग्य उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलच्या हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एचसीजेएमआरआय) अंतर्गत कार्यरत स्वीटलिंग्ज सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर टाइप १ डायबिटीसतर्फे पुण्यात विशेष जनजागृती व मोफत मधुमेह जोखीम तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. जागतिक मधुमेह दिन व राष्ट्रीय बालदिनानिमित्त १४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वीटलिंग्ज सेंटरच्या संचालिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा खाडिलकर व डॉ. वामन खाडिलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जहांगीर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आरती इराणी, वैद्यकीय अधिकारी दीपाली लडकत, स्वीटलिंग सेंटर प्रकल्प प्रमुख मोहनीश वाघ व जनसंपर्क अधिकारी नीरज रासकर उपस्थित होते.

डॉ. अनुराधा खाडिलकर म्हणाल्या, “यंदाच्या जागतिक मधुमेह दिनाची २०२६-२७ या वर्षासाठीची संकल्पना ‘मधुमेहावर वेळीच कृती’ अशी आहे. मधुमेहाचे लवकर निदान आणि जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचे महत्त्व या माध्यमातून अधोरेखित करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (आयडीएफ) अंदाजानुसार, २०५० पर्यंत जगभरातील मधुमेहग्रस्त प्रौढांची संख्या ८५ कोटी ३० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषतः ‘टाइप १ मधुमेहा’चा लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमधील वाढता धोका चिंताजनक आहे. भारतात २० वर्षांखालील सुमारे तीन लाख एक हजार मुले व किशोरवयीन मुले ‘टाइप १’ मधुमेहाने ग्रस्त असून, हा आकडा जगातील सर्वाधिक आहे.

‘टाइप १’ मधुमेहामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती अत्यल्प किंवा बंद होते. अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन उपचारांची आवश्यकता असते. हा आजार जीवनशैलीतील बदलांमुळे टाळता येत नाही. याउलट टाइप २ मधुमेह हा शरीर इन्सुलिनचा प्रभावी वापर करू शकत नसल्यामुळे होतो, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. वामन खाडिलकर म्हणाले, “अतितहान लागणे, वारंवार लघवी होणे, विनाकारण वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये पूर्वी बंद झालेले अंथरुण ओले करणे, भूक वाढणे, अशक्तपणा आणि हालचाली कमी होणे हीदेखील लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता असते. या अभियानांतर्गत पुण्यातील सार्वजनिक उद्याने तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठीही तपासणी व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि कंबरेचा घेर मोजणे यांचा समावेश असेल. तसेच आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तपासणीत जोखीम आढळणाऱ्या व्यक्तींना पुढील वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला जाणार आहे. टाईप १ मधुमेहावर उपचार म्हणून अद्याप कोणतीही औषधे उपलब्ध नसून इन्सुलिनचे इंजेक्शन हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे मुलांना इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय नसतो.”

स्वीटलिंग्ज सेंटरमध्ये सध्या ‘टाइप १’ मधुमेह असलेल्या ८५० हून अधिक मुलांची सर्वंकष काळजी घेतली जाते. नागपूर आणि कोल्हापूर येथेही ही सुविधा पुरविण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच आहारविषयक मार्गदर्शन, मधुमेह शिक्षण आणि मानसिक-सामाजिक आधारही दिला जातो. तसेच याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मोकळे वातावरण तयार करण्यात आल्याने मुले इथे येताना कंटाळा करणार नाहीत असा प्रयत्न करण्यात आला आहे. जागतिक मधुमेह दिनानिमित्त १४ नोव्हेंबरला टाइप १ मधुमेह असलेल्या वंचित मुलांसाठी विशेष कार्निव्हल, तर २१ नोव्हेंबरला तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे डॉ. खाडिलकर यांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 13, 2026

November 12, 2026

November 12, 2026