डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; बीएएमएस प्रवेशाच्या आमिषाने तरुणाची ८ लाखांची फसवणूक!

By: Editor_Manas

On: Thursday, October 22, 2026 8:43 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी मानस : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका तरुणाला बीएएमएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. प्रवेशाच्या नावाखाली पैसे उकळल्यानंतर बनावट गुणपत्रक, खोटे ओळखपत्र आणि बनावट शिक्क्यांची कागदपत्रे तयार करून तरुणाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगावातील रिंग रोड परिसरातील ‘अभिजोत करिअर फर्म’च्या संस्थापक मनीषा अजय जोशी आणि अजय जोशी या पती-पत्नीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद येथील मूळ रहिवासी मोहित रमेशराव येवले (वय ३०) हे खासगी नोकरी करतात. त्यांनी एम. फार्मसीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, डॉक्टर होण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ते प्रयत्नशील होते. याच दरम्यान त्यांचा संपर्क जळगावातील रिंग रोडवरील ‘अभिजोत करिअर फर्म’च्या संचालकांशी आला.

संशयित मनीषा जोशी आणि अजय जोशी यांनी नीट परीक्षेत कमी गुण मिळाले असले तरी पुण्यातील भारती विद्यापीठ किंवा अन्य वैद्यकीय शिक्षण संस्थेत बीएएमएस अभ्यासक्रमासाठी सहज प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून मोहित येवले यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या टप्प्यांत रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने एकूण आठ लाख रुपये दिले.

बनावट गुणपत्रक आणि ओळखपत्र पाठवून दिशाभूल

पैसे स्वीकारल्यानंतर संशयितांनी मोहित यांना पुण्यातील भारती विद्यापीठाच्या नावाने तयार केलेले कथित बनावट ओळखपत्र, शिक्का असलेली कागदपत्रांची संगणकीय प्रत आणि गुणपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत संशय आल्याने मोहित यांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पैसे परत मागितले; धनादेशही वटले नाहीत

फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर मोहित येवले यांनी संशयितांकडे भरलेल्या पैशांची परतफेड करण्याची मागणी केली. त्यानंतर पती-पत्नीने सुरुवातीला काही रक्कम परत केली. उर्वरित रकमेसाठी धनादेश देण्यात आले. मात्र, हे धनादेश नशिराबाद येथील बँक खात्यात वटले नसल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित रक्कम मिळत नसल्याने अखेर मोहित यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून मनीषा अजय जोशी आणि अजय जोशी (रा. ब्रुक बॉन्ड कॉलनी, रिंग रोड, जळगाव) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय भंडारकर करीत आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रांचा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपामुळे प्रवेश प्रक्रियेतील मध्यस्थांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संबंधित शिक्षण संस्थेची अधिकृत प्रवेश प्रक्रिया, पात्रतेचे निकष आणि कागदपत्रांची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now