पुणे, ऑक्टोबर २०२६ : सणासुदीच्या काळात पुण्यातील नेक्सस वेस्टएंड आणि द पॅव्हिलियन मॉलमध्ये भारतीय संस्कृती, कला आणि परंपरांचा अनोखा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. रामायणावर आधारित सजावट, वारली कला, कथाकथन, कला स्पर्धा आणि पारंपरिक नृत्य सादरीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नेक्सस वेस्टएंड मॉलमध्ये रामायण या महाकाव्यावर आधारित आकर्षक उत्सवी सजावट करण्यात आली आहे. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर उभारलेला भव्य मंडप, त्याकडे जाणारा पूल तसेच रामसेतू आणि अशोकवाटिका यांसारख्या प्रसंगांचे सादरीकरण हे या सजावटीचे प्रमुख आकर्षण आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मुलांसह प्रौढांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि रामकथा सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी कला स्पर्धा होणार आहे.
दरम्यान, द पॅव्हिलियन मॉलमध्ये ‘वारली दिवाळी’ या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या पारंपरिक वारली कलेचे आधुनिक रूप सादर करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या उपक्रमात वारली कलेपासून प्रेरित कलात्मक स्थापना, इन्फिनिटी रूम, छायाचित्रांसाठी विशेष कमान आणि प्रकाशमान वारली कंदील यांचा समावेश आहे.
१७ ऑक्टोबरपासून सलग चार आठवड्यांच्या अखेरीस वारली कला कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर रोजी होणारे पारंपरिक तारपा नृत्य सादरीकरण उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
या उपक्रमांद्वारे भारतीय सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासोबतच कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला एकत्र येऊन सण साजरा करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही मॉलमधील सर्व उपक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.





