पुणे, १८ ऑक्टोबर २०२६ : भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ग्रीन टायगर मोबिलिटीने पुण्यातील धनकवडी येथे इव्हॉल्टिक्स ग्रीन मोबिलिटीच्या सहकार्याने नवीन ईव्ही रेट्रोफिटिंग केंद्र सुरू केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सध्याच्या पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींचे इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करता येणार आहे.
ग्रीन टायगर मोबिलिटीने स्वदेशी आणि पेटंटप्राप्त ईव्ही रेट्रोफिट तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना त्यांच्या विद्यमान पेट्रोल दुचाकींचे पूर्णपणे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिक आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधनांवर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या दुचाकीचे रूपांतर करून इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अधिक किफायतशीर पर्याय निवडता येतो.
कंपनीने आतापर्यंत बंगळुरू, नागपूर, बेळगावी, कोल्हापूर आणि हैदराबाद येथे १,५०० हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. याशिवाय हुबळी, उडुपी, सातारा, यवतमाळ आणि मुंबई येथे नवीन केंद्रे सुरू करण्याची योजना आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आणखी १० नवीन ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. कंपनीच्या सेवांमध्ये वाहन रूपांतरण तंत्रज्ञानासोबतच ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नियमांचे पालन, वित्तपुरवठा, विमा आणि रस्त्यावरील आपत्कालीन मदत यांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक मोबिलिटीचा पर्याय स्वीकारणे अधिक सोपे आणि व्यवहार्य ठरणार आहे. तसेच विद्यमान दुचाकींचे उपयुक्त आयुष्य वाढविण्यास मदत होणार आहे.
इंधनाच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत वाढती जागरूकता लक्षात घेता, नवीन वाहन खरेदी करण्याऐवजी सध्याच्या वाहनाचे इलेक्ट्रिक रूपांतरण हा ग्राहकांसाठी एक किफायतशीर पर्याय ठरू शकतो. होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा आणि सुझुकी या प्रमुख कंपन्यांच्या निवडक दुचाकी मॉडेल्ससाठी ग्रीन टायगर मोबिलिटी रूपांतरण सुविधा उपलब्ध करून देते. ही सुविधा संबंधित वाहनाची तांत्रिक सुसंगतता आणि आवश्यक मंजुरींवर अवलंबून असेल.
पुण्यातील नवीन केंद्र हे वाहनधारकांसाठी संपर्काचे महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. येथे ग्राहकांना त्यांच्या वाहनाची तांत्रिक सुसंगतता, उपलब्ध रूपांतरण पर्याय आणि संपूर्ण प्रक्रियेची माहिती मिळू शकेल. आपल्या विस्तारणाऱ्या नेटवर्कच्या माध्यमातून रेट्रोफिट तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढविणे आणि अधिकाधिक दुचाकीधारकांना पेट्रोलवरील वाहनांसाठी पर्यायी उपाय उपलब्ध करून देणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
पुण्यातील नवीन केंद्राच्या उद्घाटनाबाबत बोलताना ग्रीन टायगर मोबिलिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. आशीष डोकानिया म्हणाले, “भारताने इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे केलेल्या वाटचालीत केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर दुचाकी वाहन क्षेत्राशी संबंधित लाखो लोकांसाठीही मूल्यनिर्मिती झाली पाहिजे. रेट्रोफिटिंगमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक किफायतशीर होतो आणि जुन्या वाहनांच्या भंगारात जाण्याशी संबंधित समस्याही कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर, प्रत्येक नवीन केंद्र स्थानिक उद्योजकांसाठी संधी निर्माण करते आणि मेकॅनिक व तंत्रज्ञांना इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नव्या युगासाठी आपली कौशल्ये विकसित करण्याची संधी देते.”





