आयव्हीएफकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोयः झेनिथच्या शिबिराला १०० हून अधिक जोडप्यांचा प्रतिसाद

By: Editor_Manas

On: Thursday, October 15, 2026 4:49 PM

Google News
Follow Us

पुणे : वंध्यत्वाबाबतची चर्चा केवळ महिलांच्या तपासण्यांपुरती मर्यादित न राहता आता दोन्ही जोडीदारांच्या प्रजनन आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची मानसिकता निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. झेनिथ अॅडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटरतर्फे आयोजिल आयव्हीएफ शिबिराला १०० हून अधिक जोडप्यांनी भेट देत तज्ज्ञांचा सल्ला घेतला, तर सल्लामसलत केलेल्यांपैकी ६२ टक्के जणांनी उपचाराच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या प्रतिसादातून आयव्हीएफकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून आले आहे.

पूर्वी वंध्यत्व किंवा आयव्हीएफ याविषयी बोलण्यास अनेक जोडपी संकोच करत. सामाजिक दबाव, गैरसमज आणि उपचारांविषयी अपुरी माहिती यामुळे अनेकदा समस्या लपवली जात असे किंवा उपचार घेण्यास विलंब होत असे. मात्र, शिबिराला मिळालेल्या प्रतिसादातून आजची पिढी वंध्यत्वाबाबत अधिक मोकळेपणाने चर्चा करत असून, उपलब्ध उपचारपद्धती समजून घेऊन प्रजनन आरोग्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले.

या बदलाबाबत बोलताना झेनिथ अडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटरच्या संस्थापक व संचालक डॉ. ममता दिघे म्हणाल्या, “आज आपण मानसिकतेत सकारात्मक बदल पाहत आहोत. आयव्हीएफ हा पूर्वीप्रमाणे निषिद्ध किंवा संकोचाचा विषय राहिलेला नाही. तो आता आरोग्यविषयक उपचारांचा एक पर्याय म्हणून अधिक मोकळेपणाने चर्चिला जात आहे.”

दरम्यान, वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये आणखी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. दिघे यांनी स्पष्ट केले. वंध्यत्वाच्या सुमारे निम्म्या प्रकरणांमध्ये पुरुष घटकही कारणीभूत असू शकतो. मात्र, गर्भधारणा होत नसल्यास तपासणीची सुरुवात प्रामुख्याने महिलांपासून केली जाते. वंध्यत्वाच्या समस्येकडे केवळ महिलेची समस्या म्हणून न पाहता दोन्ही जोडीदारांनी एकत्रित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, त्यांची गुणवत्ता किंवा हालचाल कमी असणे यांसारख्या समस्या प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात. धूमपान, मद्यपान. लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप, मधुमेह, हार्मोनल समस्या तसेच काही वैद्यकीय कारणांचाही पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. योग्य वेळी करण्यात आलेल्या तपासण्यांमधून या समस्यांचे निदान होऊन उपचाराची योग्य दिशा निश्चित करता येते.

वाढत्या वयाबरोबर प्रजनन क्षमतेत होणारी घट, बदलती जीवनशैली आणि वाढता ताणतणाव या पार्श्वभूमीवर प्रजनन आरोग्याबाबत जागरूक राहणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वाच्या विविध कारणांवर उपचार करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आयव्हीएफ, आयसीएसआय, फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, लेझर असिस्टेड हॅचिंग, मायक्रोसर्जिकल स्पर्म एक्स्ट्रक्शन, प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) तसेच तज्ज्ञांकडून दुसरे मत घेण्याची सुविधा झेनिथमध्ये उपलब्ध आहे.

आयव्हीएफ उपचाराची निवड करताना केवळ उपचारपद्धतीच नव्हे, तर वैद्यकीय तज्ज्ञांचा अनुभव, भ्रूण प्रयोगशाळेची गुणवत्ता, रुग्णांची सुरक्षितता, उपचारातील पारदर्शकता आणि प्रत्येक जोडप्याच्या गरजेनुसार आखलेली उपचारपद्धती यांनाही महत्त्व असते. त्यामुळे योग्य माहिती घेऊन, दोन्ही जोडीदारांनी एकत्रितपणे तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा वंध्यत्व उपचारातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

झेनिथच्या शिबिराला मिळालेला प्रतिसाद हा केवळ आकडेवारी नसून समाजातील बदलत्या दृष्टिकोनाचे द्योतक असल्याचे मानले जात आहे. आयव्हीएफबाबतची शांतता आणि संकोच कमी होऊन माहितीपूर्ण संवाद, योग्य तपासणी आणि आत्मविश्वासाने प्रजननविषयक निर्णय घेण्याकडे जोडप्यांचा कल वाढत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 15, 2026

October 15, 2026

October 14, 2026

October 14, 2026

October 14, 2026

October 14, 2026