डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच १२.५० लाख वाचविले; येरवडा सायबर पथकाची तत्पर कारवाई; बनावट पोलीस अधिकाऱ्यांकडून नागरिकाला धमकावून बँक खात्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न

By: Editor_Pratik

On: Thursday, October 8, 2026 2:37 PM

Google News
Follow Us

पुणे : ‘तुमचे एटीएम कार्ड एका आरोपीकडे सापडले असून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटक टाळायची असेल तर तुमच्या बँक खात्यांची, मुदत ठेवींची आणि इतर आर्थिक व्यवहारांची माहिती द्या,’ अशी धमकी देत एका ५४ वर्षीय नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच नागरिकाने तत्काळ येरवडा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाशी संपर्क साधला. सायबर पथकाने क्षणाचाही विलंब न करता संबंधित बँकांशी संपर्क साधून खाती गोठविल्याने १२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम सुरक्षित करण्यात पोलिसांना यश आले.

याप्रकरणी प्रमोद माधव पोरे (वय ५४, रा. त्रिदल नगर, येरवडा, पुणे) यांना दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला. समोरील व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोरे यांना घाबरविण्यास सुरुवात केली.

‘तुमचे एटीएम कार्ड नरेश गोयल नावाच्या आरोपीकडे सापडले आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक टाळायची असेल तर तुमच्या बँक खात्यांची, मुदत ठेवींची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती द्या,’ असे सांगून संबंधिताने पोरे यांच्यावर दबाव आणला. त्यानंतर त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची भीती दाखविण्यात आली.

घाबरलेल्या पोरे यांनी संबंधितांना त्यांच्या बँक खात्यांची माहिती दिली. मात्र, काही वेळाने आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने येरवडा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाशी संपर्क साधला.

सायबर पथकाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ हालचाली सुरू केल्या. संबंधित बँकांशी तातडीने संपर्क साधून पोरे यांची बँक खाती गोठविण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या खात्यातील १२.५० लाख रुपयांची रक्कम सायबर भामट्यांच्या हातात जाण्यापासून वाचली.

या प्रकरणातून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या अशा धमकीच्या दूरध्वनींपासून सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. सीबीआय, ईडी, पोलीस, सीमाशुल्क विभाग अथवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या नावाने दूरध्वनी करून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैसे किंवा गोपनीय माहिती मागणे हा सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा प्रकार आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सीबीआय, ईडी, पोलीस किंवा सीमाशुल्क विभागाच्या नावाने अशा प्रकारचा दूरध्वनी आल्यास घाबरून जाऊ नये. कोणतीही वैयक्तिक किंवा बँक खात्याची माहिती, संकेतशब्द अथवा एकदाच वापरला जाणारा संकेतांक (ओटीपी) कोणालाही देऊ नये. संशयास्पद दूरध्वनी आल्यास तातडीने १९३० या सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ चिलुमुला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक शारदा कोकाटे (गुन्हे), पोलीस निरीक्षक केशव दिंडे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस हवालदार समीर पिलाने, पोलीस शिपाई मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे, महिला पोलीस शिपाई रोहिणी भोकसे आणि महिला पोलीस शिपाई मिनाक्षी कापडे यांच्या सायबर तपास पथकाने ही कारवाई केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now