प्रतिनिधी – मानस : बिबवेवाडी परिसरातील आईमाता मंदिर रस्त्यावर बेकायदा बाळगलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी सुटून २५ वर्षीय तरुण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीनाविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी तरुणाचे नाव विजय भास्कर पाटील (वय २५, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव-कात्रज) असे आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार शिवानंद बोले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन गुलटेकडी परिसरातील एका वसाहतीत राहतो. तो आणि विजय पाटील मित्र आहेत. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील आईमाता मंदिराजवळील मोकळ्या जागेत दोघे थांबले होते.
यावेळी अल्पवयीनाने त्याच्याकडे असलेले देशी बनावटीचे पिस्तूल पाटील याला दाखवले. पिस्तूल हाताळत असताना त्याचा चाप ओढला गेल्याने अचानक गोळी सुटली आणि पाटील जखमी झाले.
घटनेनंतर घाबरलेल्या अल्पवयीनाने पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली. पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अल्पवयीनाकडे बेकायदा पिस्तूल आले कुठून, त्याने ते का बाळगले होते आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. दोघांचीही पार्श्वभूमी तपासली जात आहे.
पोलीस उपनिरीक्षक निवास शिंदे तपास करीत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





