राहू परिसरात सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद

By: Editor_Manas

On: Sunday, October 4, 2026 3:13 PM

Google News
Follow Us

राहू : दौंड तालुक्यातील राहूजवळील माधवनगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. आज (ता. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुमारे साडेचार वर्षांची मादी बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकली. यापूर्वी काल (ता. ३) पहाटे याच परिसरात सुमारे दोन वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला होता.

एकाच ठिकाणी सलग दोन दिवस बिबटे जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या भागात नेमके किती बिबटे आहेत, याबाबत स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नसल्याने नागरिकांकडून वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नियमानुसार तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

लोकवस्तीत बिबट्यांचा वावर वाढला

राहू परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबटे नागरिकांच्या दिशेने धावून येणे, तसेच शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी पशुधनावर हल्ले करण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मानव-बिबट्या संघर्षाची शक्यता लक्षात घेता वन विभागाने संवेदनशील भागांमध्ये तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी

राहूजवळील शिंदेनगर, माधवनगर, चव्हाणवाडी तसेच राहू-दहिटणे रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. या भागात बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल अधिवास उपलब्ध असल्याने बिबट्यांचा वावर अधिक असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे या परिसरात अधिक पिंजरे लावून बिबट्यांचा शोध व बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बिबटे कुठे सोडले जातात? नागरिकांचा सवाल

दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहू बेट परिसरात यापूर्वीही अनेक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. मात्र, जेरबंद केलेल्या बिबट्यांना नेमक्या कोणत्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते, याबाबत नागरिकांकडून माहितीची मागणी होत आहे.

वन विभागाने बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर संबंधित ठिकाणाची माहिती स्थानिक सरपंच, पोलीस पाटील किंवा जबाबदार नागरिकांना द्यावी, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now