पुणे : पुणे शहरात अवघ्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप आणि समाजमाध्यमांवरील एक ‘रील’ सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त कार्यालयाकडून संबंधित पोलिस ठाणे, गुन्हे शाखा आणि सायबर विभागामार्फत माहितीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान शहरात अशा प्रकारे १२३ मुलींचे अपहरण झाल्याची कोणतीही घटना घडल्याचे आढळून आले नाही.
पोलिसांनी संबंधित ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन तिची चौकशी केली. तसेच संबंधित सोसायटीचे व्यवस्थापन, स्थानिक पदाधिकारी, शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेण्यात आली. या चौकशीत १२३ मुलींच्या अपहरणासंदर्भात कोणताही पुरावा, पोलिस नोंद किंवा तक्रार आढळली नाही.
त्यामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेली ही माहिती अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच त्यांची पुढे प्रसारित करून अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





