पुणे : चाळिशीनंतर उद्भवणाऱ्या जवळच्या दृष्टीदोषामुळे चष्म्यावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी करण्यात येणाऱ्या ‘प्रेलेक्स’ (PRELEX) शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात डॉ. दुधभाते नेत्रालयाने ५०० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा टप्पा गाठला आहे. अत्याधुनिक ‘सेंट्युरियन गोल्ड फेकोएमल्सिफिकेशन’ प्रणाली आणि ‘व्हेरिऑन प्रतिमानिर्देशित तंत्रज्ञान’ाच्या साहाय्याने ‘गॅलेक्सी’सह विविध उच्च दर्जाची कृत्रिम भिंगे प्रत्यारोपित करण्यात आली आहेत.
चाळिशीनंतर जवळचे, मध्यम अंतरावरील किंवा दूरचे पाहताना चष्म्याची गरज भासू शकते. योग्य रुग्णांमध्ये प्रेलेक्स शस्त्रक्रियेद्वारे डोळ्यातील नैसर्गिक भिंगाच्या जागी कृत्रिम भिंग प्रत्यारोपित केले जाते. त्यामुळे जवळचे, मध्यम अंतरावरील आणि दूरचे पाहताना चष्म्यावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान, वेल्हा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी या शस्त्रक्रियेचा त्यांचा अनुभव उपस्थित सुमारे ५५० डॉक्टरांसमोर मांडला. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या डोळ्यांमध्ये ‘गॅलेक्सी’ उच्च दर्जाचे कृत्रिम भिंग प्रत्यारोपित करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर जवळचे, मध्यम अंतरावरील तसेच दूरचे पाहताना चष्म्याची गरज भासत नसल्याचे त्यांनी सांगितले.
“आज मला एखाद्या २५ वर्षांच्या तरुणासारखी स्पष्ट दृष्टी मिळाल्याचा आनंद होत आहे,” अशा शब्दांत डॉ. देवकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या या अनुभवातून प्रेलेक्स शस्त्रक्रियेनंतरच्या दृष्टीतील बदलांचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थित डॉक्टरांसमोर आला.
अत्याधुनिक शस्त्रक्रिया प्रणाली, प्रतिमानिर्देशित तंत्रज्ञान, उच्च दर्जाची कृत्रिम भिंगे आणि अनुभवी नेत्रतज्ज्ञांचे कौशल्य यांच्या माध्यमातून रुग्णांच्या गरजेनुसार उपचार नियोजनावर भर दिला जात असल्याचे डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
५०० हून अधिक प्रेलेक्स शस्त्रक्रिया पूर्ण होणे हा अत्याधुनिक नेत्रसेवा आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धतीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचे नेत्रालयाच्या टीमने नमूद केले.





