गणपतीला लाल फुल का वाहतात ?

By: Editor _2

On: Wednesday, September 16, 2026 4:21 AM

Google News
Follow Us

लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते : गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे अध्यात्मशास्त्र काय सांगते?

हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.

या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: ‘पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?’ मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’ (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.

सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क ‘एंटेना’सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.

त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!

‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म कार्यपद्धती समजून घेतल्यास, आपण आपल्या दैनंदिन पूजाविधींमधून जास्तीत जास्त सकारात्मक स्पंदने प्राप्त करू शकतो.

—  सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now