नवी दिल्ली, 4 सप्टेंबर २०२६ : बेल्जियमच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत फोर्ज लिमिटेडची पूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि थेल्स या कंपन्यांनी धोरणात्मक सहकार्य करारावर शिक्कामोर्तब केले. या कराराअंतर्गत भारतीय सशस्त्र दलांकडून आधीच वापरल्या जाणाऱ्या ‘थेल्सच्या ‘७० मिमी रॉकेट सिस्टिम्स’च्या अनगाइडेड आणि लेझर-गाइडेड प्रकारांमध्ये सहकार्याच्या संधींचा शोध घेतला जाणार आहे.
- आपल्या दशकभराच्या सहकार्याला पुढे नेत आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेशी सुसंगत राहून, थेल्स आणि कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) यांनी भारतात ७० मिमी रॉकेट सिस्टिम्ससाठी प्रगत औद्योगिक क्षमता उभारण्याच्या उद्देशाने धोरणात्मक सहकार्य करार केला आहे.
- या भागीदारीत ‘थेल्स’चे युद्धस्थितीत सिद्ध झालेले रॉकेट तंत्रज्ञान आणि ‘केएसएसएल’च्या प्रगत उत्पादन, एकत्रीकरण व चाचणी क्षमता यांची सांगड घालण्यात आली आहे. यामुळे भारताच्या तसेच जागतिक गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
- या सहकार्यामुळे अनगाइडेड आणि लेझर-गाइडेड ७० मिमी रॉकेट सिस्टिम्स तसेच संबंधित उपकरणांसाठी तंत्रज्ञान हस्तांतरण, स्थानिक उत्पादन आणि वितरण यांसाठी आवश्यक चौकट उपलब्ध होणार आहे.
- स्थानिक पुरवठा साखळी विकसित करणे आणि प्रगत रॉकेट सिस्टिम्सच्या उत्पादन व निर्यातीसाठी भारताला महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश.
- भारतात तयार होणारे पहिले संपूर्ण ७० मिमी रॉकेट २०२७ च्या सुरुवातीला उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट.
ही भागीदारी भारत आणि बेल्जियम यांच्यातील संरक्षण सहकार्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. तसेच भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक संरक्षण उत्पादन केंद्र बनविण्याच्या उद्दिष्टालाही यामुळे चालना मिळणार आहे. ‘थेल्स’चे प्रगत रॉकेट तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील अनुभव यांची सांगड ‘केएसएसएल’च्या संरक्षण उत्पादन, सिस्टिम इंटिग्रेशन आणि औद्योगिकीकरण क्षेत्रातील अनुभवाशी घातली जाणार आहे. यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय संधींचाही लाभ घेता येईल अशी स्वदेशी क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या सहकार्याचा भाग म्हणून थेल्स भारताशी असलेल्या आपल्या दीर्घकालीन संबंधांचा उपयोग करणार आहे. तसेच बेल्जियममध्ये विकसित करण्यात आलेल्या २.७५ इंची / ७० मिमी रॉकेट्स आणि लॉन्चर्स क्षेत्रातील आपला जागतिक अनुभवही कंपनी उपलब्ध करून देणार आहे. दुसरीकडे, केएसएसएल आपल्या स्थानिक उत्पादन आणि चाचणी सुविधांचा वापर करून ‘थेल्स’च्या मान्यताप्राप्त पुरवठा साखळीतील घटकांचे उत्पादन आणि एकत्रीकरण करणार आहे. यामुळे उत्पादन प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्ता मानकांचे पालन सुनिश्चित केले जाईल.
‘थेल्स इंडिया’चे व्हाइस प्रेसिडेंट अंकुर कानगळेकर म्हणाले, “थेल्सने अनेक दशकांपासून भारतासोबत भागीदारी केली आहे. ‘केएसएसएल’सोबतचे सहकार्य हे भारतातील संरक्षण क्षेत्राशी असलेल्या आमच्या दीर्घकालीन आणि सखोल संबंधांचे प्रतीक आहे. बेल्जियममधील युद्धस्थितीत सिद्ध झालेल्या ७० मिमी रॉकेट तंत्रज्ञानाचा आणि ‘केएसएसएल’च्या अभियांत्रिकी व उत्पादन क्षमतेचा एकत्रित वापर करून आम्ही अशा क्षमता विकसित करीत आहोत, ज्यामुळे भारताची संरक्षण सज्जता वाढण्यास मदत होईल. तसेच महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानांमध्ये आत्मनिर्भरतेचे भारताचे उद्दिष्टही पुढे नेले जाईल.”
‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश तुंगार म्हणाले, “थेल्सच्या सिद्ध तंत्रज्ञानाची आणि ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स’च्या प्रगत औद्योगिक परिसंस्थेची सांगड या भागीदारीत घालण्यात आली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशात उभारण्यात येत असलेल्या आमच्या एनर्जेटिक्स सुविधेचाही समावेश आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे पुढील पिढीतील रॉकेट सिस्टिम्सच्या स्वदेशी उत्पादनाचा पाया रचला जात आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या संरक्षण सज्जतेला बळ देण्याबरोबरच हे सहकार्य ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेलाही पुढे नेते आणि भारताला प्रगत संरक्षण तंत्रज्ञानांसाठी जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत करते.”
‘थेल्स’च्या ७० मिमी रॉकेट सोल्युशन्सवर ५५ देशांतील ७० सशस्त्र दलांचा विश्वास आहे. ही सोल्युशन्स हवाई, जमिनीवरील आणि सागरी क्षेत्रांमधील विविध प्रकारच्या मोहिमांसाठी वापरता येतात. तसेच विविध प्लॅटफॉर्म्सशी त्यांचे एकत्रीकरणही करता येते. यामध्ये अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर (एएलएच-डब्ल्यूएसआय) आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) यांसारख्या रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचाही समावेश आहे. त्यामुळे संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि लढाऊ क्षमता वाढण्यास मदत होते. अपारंपरिक युद्धाच्या (असिमेट्रिक वॉरफेअर) नव्या युगात थेल्सच्या प्रगत ७० मिमी रॉकेट्सचे विविध प्रकार ड्रोनविरोधी मोहिमांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहेत. बदलत्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी ही प्रणाली विश्वासार्ह आणि गरजेनुसार विस्तार करता येणारी क्षमता उपलब्ध करून देते.
तंत्रज्ञान हस्तांतरण, स्थानिक मूल्यनिर्मिती आणि कौशल्य विकास यांच्या माध्यमातून भारतातील स्वदेशी संरक्षण क्षमतांचा विकास करण्याच्या दोन्ही कंपन्यांच्या प्रयत्नांना या सहकार्यामुळे नवी चालना मिळणार आहे. यामुळे जागतिक संरक्षण पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताची भूमिका अधिक दृढ होत आहे. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनांना चालना मिळत असून भारत-बेल्जियम संरक्षण सहकार्यालाही नवी गती मिळत आहे.





