एल कॅटरटनच्या ३० दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीच्या पाठिंब्याने ही संस्था पुढील दोन वर्षांत भारतभरात ६० नवीन केंद्रे सुरू करण्याची योजना आखत आहे
पुणे, २५ ऑगस्ट २०२६: हिलिंग हँड्स क्लिनिक ही प्रोक्टॉलॉजी आणि अॅनोरेक्टल केअर क्षेत्रातील विशेष संस्था आपल्या पुढील वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे पुढील दोन वर्षांत भारतभरात आपली केंद्रे ४० वरून १०० पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. संपूर्ण नेटवर्कमध्ये सातत्यपूर्ण, उच्च-दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लिनिकल, तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल यंत्रणा अधिक मजबूत करताना विशेष अॅनोरेक्टल उपचार रुग्णांच्या अधिक जवळ आणणे हा या विस्ताराचा उद्देश आहे.
एल कॅटरटनच्या ३० दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीच्या पाठिंब्याने होणारा हा विस्तार पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये विशेष अॅनोरेक्टल उपचारांची उपलब्धता सुधारण्यावर भर देईल. तसेच हिलिंग हँड्स क्लिनिकला व्यापक विशेष आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करण्यास मदत करेल.
ही संस्था भारतभरात ६० नवीन केंद्रे सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे संस्थेची उपस्थिती १०० पेक्षा जास्त नवीन पिन कोड्समध्ये विस्तारणार आहे.
हिलिंग हँड्स क्लिनिकची सुरुवात पुण्यातील एका छोट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) केंद्रापासून झाली होती. आता प्रमुख केंद्राच्या पाठिंब्याने आणि ८०० पेक्षा जास्त कर्मचा-यांच्या टीमसह त्याचे ४० केंद्रांच्या जाळ्यात रुपांतर झाले आहे. हे क्लिनिक सध्या दरवर्षी ५०,००० नवीन रुग्णांवर उपचार करते.
या विस्ताराचा भाग म्हणून, हिलिंग हँड्स क्लिनिक पुढील १८ महिन्यांत पुण्यात एक समर्पित सुपर-स्पेशलिटी प्रोक्टॉलॉजी हॉस्पिटल सुरू करण्याची योजना आखत आहे. हे हॉस्पिटल गुंतागुंतीच्या आणि वारंवार उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी समर्पित पायाभूत सुविधा प्रदान करेल. तसेच प्रगत उपचार पद्धती, क्लिनिकल संशोधन, सर्जन प्रशिक्षण आणि विशेष रुग्ण सेवेला पाठिंबा देईल.
हिलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक आणि अॅनोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “प्रोक्टॉलॉजीला इतर प्रत्येक वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे सखोलता, सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळायला हवा. आमचे काम नेहमी एका सोप्या ध्येयाने प्रेरित राहिले आहे: अवयवांची कार्यक्षमता टिकवून ठेवणे आणि उपचारांचा त्रास कमी करणे यासह रुग्णाची समस्या पूर्णपणे सोडवणे. गुंतागुंतीच्या आणि वारंवार होणाऱ्या भगंदर (फिस्ट्युला) उपचारासाठी डिस्टल लेझर प्रॉक्सिमल लायगेशन (डीएलपीएल), मूळव्याधीसाठी (हॅमिरॉइड्स) टप्प्यानुसार दिलेला दृष्टिकोन, पायलोनिडल सायनससाठी लेझर पायलोनिडॉटॉमी आणि रेक्टल प्रोलॅप्ससाठीच्या तंत्रज्ञानातील नवनिर्मिती याच दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. एल कॅटरटनसोबत आमचा सहयोग उपचारांची उपलब्धता वाढवण्यास, संशोधनाला पाठबळ देण्यास आणि विशेष अॅनोरेक्टल सेवेसाठी राष्ट्रीय संस्था उभारण्यास मदत करेल, ज्याद्वारे योग्य रुग्णाला योग्य टप्प्यावर योग्य उपचार मिळतील याची खात्री होईल.”
हिलिंग हँड्स क्लिनिकचे सह-संस्थापक आणि सीईओ रोशन पोरवाल म्हणाले, “४० केंद्रांवरून १०० केंद्रांपर्यंत विस्तार करणे हे आमचे ध्येय आहे, पण केवळ केंद्रांची संख्या वाढवणे हे आमचे धोरण नाही. रुग्णाच्या पिन कोडवर उपचारांचा दर्जा अवलंबून नसेल असे एक कनेक्टेड नेटवर्क तयार करणे हे आमचे धोरण आहे. यासाठी योग्य शहरांची निवड, प्रबळ क्लिनिकल नेतृत्व, प्रशिक्षित टीम, प्रमाणित कार्यपद्धती आणि पारदर्शक कामगिरी आवश्यक आहे. आम्ही पुढे प्रगती करू, तसतसे तंत्रज्ञान आम्हाला उपचारांमध्ये समन्वय साधण्यास, फॉलो-अप करण्यास आणि चुका वेळीच ओळखण्यास मदत करेल, तर प्रत्येक रुग्णाबाबतच्या निर्णयात क्लिनिकल निर्णय केंद्रस्थानी राहील.”
प्रोक्टॉलॉजिकल आजारांशी अनेकदा सामाजिक भीती, चुकीची माहिती आणि उपचारांना होणारा उशीर जुडलेला असतो, ज्यामुळे अनेक रुग्ण वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे टाळतात. २०२६ च्या एका संशोधनामध्ये युरीन इन्कॉन्टिनन्स (लघवीवर नियंत्रण न राहणे) असलेल्या रुग्णांमध्ये अॅनोरेक्टल आजारही एकत्र आढळले आहेत. हिलिंग हँड्स क्लिनिक तज्ज्ञांची उपलब्धता वाढवून, लवकर निदानाला प्रोत्साहन देऊन आणि खाजगी व सन्मानजनक उपचार प्रदान करून या अडचणी दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
नेटवर्क वाढेल, तसतसे हिलिंग हँड्स क्लिनिक संशोधन, सर्जन प्रशिक्षण आणि सामाजिक सुलभतेवर आपला भर अधिक वाढवेल. विस्ताराचा वेग क्लिनिकल तयारीनुसार ठरवला जाईल, ज्यामुळे सर्व केंद्रांमध्ये गुणवत्तेचे मानक एकसमान राहील.
हिलिंग हँड्स फाउंडेशनच्या माध्यमातून ही संस्था विशेष अॅनोरेक्टल उपचार अधिक सुलभ आणि परवडणारे करण्यासाठी कार्यरत आहे, ज्या अंतर्गत ४०० हून अधिक समुदाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. पुण्यात जागतिक मूळव्याध दिन २०२५ च्या उपक्रमात १२ तासांत अॅनोरेक्टल तपासणीसाठी सर्वाधिक व्यक्तींनी नावनोंदणी केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद झाली, ज्यामध्ये ३५२ पात्र सहभागींची तपासणी करण्यात आली.





