पुणे : बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता यावर भाष्य करणारा ‘बीड फाइल्स’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्याशी संबंधित व्यक्तिरेखा आणि सामाजिक वास्तवावर विशेष प्रकाश टाकला जाणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
डॉ. डोईफोडे फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या ‘बीड फाइल्स’मध्ये बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमागील सामाजिक आणि व्यवस्थात्मक वास्तवाचा वेध घेण्यात येणार आहे. गुन्हेगारीला खतपाणी घालणारी परिस्थिती, व्यवस्थेतील त्रुटी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. या पोस्टरमधून चित्रपटाच्या गंभीर आणि वास्तववादी आशयाची झलक पाहायला मिळते. विशेषतः तृप्ती देसाई यांना केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात येणारा सामाजिक दृष्टिकोन चित्रपटाला वेगळी धार देणार असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. शशिकांत डोईफोडे हे चित्रपटाचे निर्माते असून शिवराज बांगर सह-निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश शिंदे करणार आहेत. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तृप्ती देसाईंची भूमिका नेमकी कशा स्वरूपाची असेल आणि बीडमधील वास्तवाचे चित्रण कोणत्या पद्धतीने केले जाणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मनोरंजनासोबतच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणारा ‘बीड फाइल्स’ हा चित्रपट बीडमधील गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे.





