गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. चुकून एखाद्या गोष्टीवर क्लिक झालं आणि नंतर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता अशाच प्रकारच्या फसवणुकीची पण वेगळी घटना उघडकीस आली आहे.
आधार कार्डचा गैरवापर करून तब्बल १.७४ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका कथित प्रसिद्ध रीलस्टारला पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वृद्ध व्यक्तीची १.७४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात या कथित रीलस्टारचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
पुणे सायबर पोलिसांनी एका २६ वर्षीय सोशल मीडिया रीलस्टारला अटक केली. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वृद्ध व्यक्तीची १.७४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. रोहन जाधव असं या संशयिताचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
“रोहन हा मूळ छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे. त्याने एका नागरिकाच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावाने एका बँकेत बनावट खातं उघडलं होतं आणि त्या खात्याचा वापर एका गुन्ह्यात करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच आरोपीने डिजिटल अरेस्टची धमकी देऊन डेक्कन परिसरातील एका ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीची १०.७३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे”, अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
दरम्यान, याच प्रकरणात पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये शुभम (२६) आणि त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली होती. तसेच मार्चमध्ये अमर (२४) या आणखी एका संशयिताला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. या प्रकरणाचा तपास करत असताना चौकशीदरम्यान पोलिसांना रोहनबाबत माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





