पुणे : येरवडा खुले कारागृहातील बंदीवानांच्या आरोग्यासह त्यांच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देत कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या पुढाकारातून व्यसनमुक्तीपर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ धोरणांतर्गत शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला १५० हून अधिक शिक्षाबंदीवानांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येरवडा खुले कारागृह आणि पुण्यातील मनोविजय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. बंदीवानांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ देणे, व्यसनांमुळे होणाऱ्या शारीरिक, आर्थिक व कौटुंबिक दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि सुटकेनंतर त्यांना निरोगी व सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
हा उपक्रम डॉ. सुहास वारके (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे; योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी प्रमुख मार्गदर्शक तथा मनोविजय फाउंडेशनचे सल्लागार निलेश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बंदीवानांचे केवळ कारावासापुरते व्यवस्थापन न करता त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने परत आणण्यासाठी अशा प्रबोधनात्मक उपक्रमांची आवश्यकता असल्याच्या भूमिकेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निलेश शिंदे यांनी तंबाखू, सिगारेट, मद्य, गांजा तसेच विविध अमली पदार्थांच्या व्यसनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची माहिती दिली. व्यसनामुळे व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याबरोबरच कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक घडीही कशी विस्कटते, हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
तरुण पिढीमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. महाविद्यालयीन युवक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी तसेच विविध खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत तरुणांवर जाहिराती, चित्रपट आणि बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव पडत असल्याचे सांगत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या मार्गावरून परत फिरणे शक्य असून दृढ इच्छाशक्ती, योग्य समुपदेशन आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त होऊन समाजात ताठ मानेने व निरोगीपणे जीवन जगू शकते, असा विश्वास त्यांनी बंदीवानांना दिला.
व्याख्यानाला उपस्थित बंदीवानांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा खुले कारागृहात बंदीवानांच्या सुधारणा, आरोग्य आणि पुनर्वसनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या मालिकेतील हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे, निशा श्रेयकर, सुभेदार सुनील गायकवाड, चंद्रकांत खांदवे, बालाजी सावंत, हवालदार राजेंद्र धनगर, वैशाली थोरात, महिला कारागृह शिपाई मोनिका लांडगे, मिसबा सय्यद, सुरेखा म्हात्रे तसेच कारागृह शिपाई अशोक होले, विजयकुमार दिवेकर, याकुब शेख आणि महेंद्र लोहकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.





