पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अशित वेदप्रकाश जाधव यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला. मात्र, निलंबनाचे नेमके कारण आदेशात नमूद करण्यात आलेले नसल्याने महापालिका वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राजकीय दबाव तसेच महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या एका संदेशामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा रंगली आहे.
निलंबन आदेशानुसार, ११ जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जाधव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्या दिवशी नेमकी कोणती घटना घडली, आयुक्तांना त्यांनी कोणता संदेश पाठविला आणि त्यातील मजकूर काय होता, याचा कोणताही उल्लेख आदेशात करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५६ (२) (फ) अंतर्गत विभागीय चौकशी प्रलंबित असताना ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महापालिका वर्तुळातील चर्चेनुसार, अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच जाधव यांची पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली होती. या बदलीबाबत ते नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ते महिनाभर रजेवर गेले होते. १ जुलै रोजी ते पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र, पाणीपुरवठा विभागाऐवजी बांधकाम अथवा पथ विभागात बदली मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते.
चर्चेनुसार, इच्छित बदली मिळविण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले. आयुक्तांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर त्यांनी थेट आयुक्तांना संदेश पाठविल्याचे सांगितले जाते. त्या संदेशात आक्षेपार्ह व अयोग्य भाषेचा वापर झाल्याचा आरोप असून, त्यातून दिसून आलेल्या गंभीर वर्तनाची दखल घेत ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चेला महापालिका प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
महापालिकेची हद्द सोडण्यासही निर्बंध
निलंबन आदेशात अशित जाधव यांच्यावर काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशी पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी तातडीने पूर्ण करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच, महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय जाधव यांना महापालिकेचे हद्दीक्षेत्र सोडता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.





