पुणे, ता. २९ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. निकाल जाहीर होताच पीडितेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
राज्यातील सर्वात जलदगतीने निकाल लागलेल्या प्रकरणांपैकी हा एक ठरला असून, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकरण
निकाल देताना न्यायालयाने आरोपीच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने म्हटले की, चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. तिच्या शरीरावर तब्बल १८ जखमा आढळल्या. हत्येनंतरही तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद करत अशा आरोपीला कोणतीही दया दाखविण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.
आरोपीचा गंभीर गुन्हेगारी पूर्वइतिहास
तपासात आरोपी भीमराव कांबळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. यापूर्वीही त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तसेच एका वृद्ध महिलेसह अन्य महिलेवरही हल्ला आणि अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला कायद्याची भीती नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
पुणे ग्रामीण पोलिसांची प्रभावी तपासणी
या संवेदनशील प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगाने पूर्ण केला. घटना घडल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत सुमारे १,२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. खटल्यात एकूण ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वाच्या निकालांचा आधार घेत सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. डीएनए, फॉरेन्सिक, सायबर आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आले.
नसरापूर प्रकरण : घटनाक्रम
- १ मे २०२६ : साडेतीन वर्षांची चिमुरडी बेपत्ता; काही वेळात मृतदेह आढळला.
- २ मे : आरोपीला ताब्यात; अपहरण, लैंगिक अत्याचार व हत्येचा गुन्हा दाखल.
- मेचा पहिला आठवडा : फॉरेन्सिक अहवाल, डीएनए आणि इतर वैज्ञानिक पुरावे संकलित.
- १६ मे : अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानी दोषारोपपत्र दाखल.
- २८ मे : न्यायालयाने आरोप निश्चित करून खटल्यास सुरुवात.
- जून २०२६ : ५५ साक्षीदारांच्या साक्षी, वैज्ञानिक पुरावे व अंतिम युक्तिवाद.
- २९ जून २०२६ : विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली.





