चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील धामापूर जिल्हा परिषद गट कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न – आमदार शेखर निकम

By: Editor_Manas

On: Friday, June 19, 2026 4:48 PM

Google News
Follow Us

संगमेश्वर: धामापूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) कार्यकर्त्यांचा मेळावा सरंद येथे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, विकासकामांचा आढावा घेणे तसेच बदलत्या राजकीय परिस्थितीची माहिती देणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, पक्षाची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असते. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच खरी लोकसेवा आहे. विकासकामे ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बदलत्या राजकीय परिस्थितीत संयम, शिस्त आणि संघटनात्मक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कार्यकर्त्यांना जनतेशी अधिक संवाद साधण्याचा सल्ला दिला. आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि विकासाची भूमिका घराघरांत पोहोचवून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असेही ते म्हणाले.

मेळाव्यात विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटना बळकट करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या मेळाव्यास राजेंद्र पोमेंडकर (संगमेश्वर तालुकाध्यक्ष), अजय बिरवटकर (जिल्हा परिषद सदस्य), सुशील भायजे (जिल्हा परिषद सदस्य), प्रिया सुवरे (पंचायत समिती सदस्य), दीपक जाधव (माजी पंचायत समिती सदस्य), नाना कांगणे (माजी पंचायत समिती सदस्य), जाकीर शेखासन (अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष), गणपत चव्हाण, तुकाराम मिस्त्री, उमेश महाडिक, सुबोध चव्हाण, शेखर उकर्डे, कृष्णा जोगले, प्रकाश वीर, शांताराम भायजे, निलेश भुवड, सुलतान कापडी, कमर सावंत, अमर जाधव, विष्णू मांडवकर, लहू सुर्वे, दीपक शिगवण, बाबू कवळकर, गंगाराम भायजे, प्रवीण गोमाने, पांडुरंग येलोंढे, आर. के. बाचिम, संतोश गोटेकर, रूपेश गोथाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा संघटनात्मक एकजुटीचा आणि आगामी वाटचालीस नवी दिशा देणारा ठरला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now