अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

By: Editor_Pratik

On: Wednesday, June 17, 2026 5:23 PM

Google News
Follow Us

पुणे – नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच, शहरात देखील असाच एका भोंदू बाबाचा भांडाफोड झाला आहे. ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे.

राधामोहन मिश्रा (वय-५९, रा. माऊली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव ॲम्बियस जवळ, उबाळेनगर, पुणे) असे या नराधम भोंदू बाबाचे नाव आहे. तर त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५८) या दोघांसह अन्य सहा महिलांविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार खराडी पोलिसांनी लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट रचणे तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २००९ ते २०२६ दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला उच्चशिक्षित असून, येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे आई-वडील डॉक्टर आहेत. स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात एकदा महिलेचे वडील गेले होते. कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबीयांची भोंदूबाबा मिश्राशी ओळख झाली. त्यावेळी मिश्राचा आश्रम पंचकुला येथे होता. त्याचे नाव गुरुदेव साधना धाम ट्रस्ट असे होते.

पुढे महिलेचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. त्यांना महाराज हे दिव्य पुरूष आहेत, असे सांगण्यात आले होते. भोंदूबाबाच्या मॉडर्न गुरुकुलाचा सुरुवातीचा सगळा खर्च महिलेच्या वडिलांनीच केला. महिला देखील मिश्राच्या आश्रमात राहत होती. दरम्यानच्या काळात त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

२०१० मध्ये महिला आणि तिच्या कुटुंबीयांना त्यांच्या गावातून पुण्यात स्थलांतरित होण्यास भाग पाडले. २०१३ ते २०१६ दरम्यानच्या काळात मिश्राने महिलेचा छळ केला. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडिओ काढले, विजेचे शॉक दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपींना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी –

खराडी पोलिसांनी आरोपी राधामोहन मिश्रा आणि स्वामी कंवल नयन यांच्यासह सहा महिलांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. आरोपी यांच्याकडे अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा याबाबत तपास करायचा आहे. त्यांचे अजून कुणी साथीदार आहेत का? आरोपींनी फिर्यादीचे अश्लील चित्रीकरण केले असून, तो कुठे प्रसारित केला आहे याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. सुधीर शाह, ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि ॲड. निवृत्ती कराड यांनी बाजू मांडली.

पतीपासून विभक्त करत मालमत्ता नावावर केली –

शारीरिक व मानसिक छाळाबरोबरच महिलेला तिच्या पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडून तिची मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेतली. महिलेच्या आई-वडिलांची भोंदूवर मोठी श्रद्धा असल्याने त्याचा गैरफायदा घेत तिला त्यांच्या नजरेत खोटे ठरवले. अखेर १७ वर्षांपासून या भोंदूच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने दुसऱ्या राज्यात असलेले आपले घर गाठले. आई-वडिलांना विश्वासात घेऊन या भोंदूची कुंडली त्यांच्यासमोर मांडल्यानंतर शेवटी महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026