कुराश खेळाडूंच्या हितासाठी कुराश असोसिएशन आक्रमक; मानवाधिकार संस्थेविरोधात अधिकृत तक्रार; हनुमंत धायगुडें

By: Editor_Manas

On: Wednesday, June 17, 2026 3:41 PM

Google News
Follow Us

पुणे : कुराश असोसिएशन महाराष्ट्रने मानवाधिकार संरक्षण आणि जागरूकता (नोंदणी क्र. 982/14)  या संस्थेविरोधात मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच मा. पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेकडून कुराश खेळ, खेळाडू, क्रीडा प्रमाणपत्रे, खेळाडू आरक्षण आणि पोलीस भरती प्रक्रियेशी संबंधित विषयांमध्ये सातत्याने हस्तक्षेप करून विविध शासकीय विभागांकडे तक्रारी करण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲड.असीम सरोदे, शिवाजी साळुंखे, खेळाडू शिवशरण माने, प्रकाश माळवदकर, ओंकार विभुते, अँड बाळकृष्ण निढाळकर, मल्लिनाथ देडे पाटील आदी उपस्थितीत होते.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, कुराश खेळाडूंना देण्यात आलेली क्रीडा प्रमाणपत्रे ही क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आवश्यक पडताळणीनंतर वैध ठरविण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत वारंवार आक्षेप घेऊन तक्रारी करणे हे खेळाडूंचे मनोबल खच्चीकरण करणारे असून संपूर्ण कुराश खेळाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

यासोबतच हनुमंत धायगुडे नावाची व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कुराश असोसिएशन महाराष्ट्र, त्याचे पदाधिकारी आणि खेळाडूंविषयी दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती प्रसारित करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या क्रीडा कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे असोसिएशनने नमूद केले.

कुराश हा अधिकृत नियमांनुसार विशेष क्रीडा मॅटवर खेळला जाणारा खेळ असून त्याबाबत शासन निर्णय आणि तांत्रिक नियमावली स्पष्ट आहे. मात्र, काही तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना फरशीवर खेळण्यास सांगण्यात आल्याने खेळाच्या तांत्रिक निकषांबरोबरच खेळाडूंच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे मिळणाऱ्या आरक्षण व भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी स्पष्ट धोरण आणि कायदेशीर प्रक्रिया असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कुराश असोसिएशन महाराष्ट्रने राज्य शासन, क्रीडा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे आवाहन केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026