प्रवीण तरडेंची मोठी घोषणा! ‘मुळशी पॅटर्न 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By: Editor_Manas

On: Monday, June 8, 2026 3:17 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, मुंबई : ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, ‘मुळशी पॅटर्न 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने ग्रामीण भागातील जमीन व्यवहार, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बदलत्या सामाजिक वास्तवावर भाष्य करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची चर्चा सातत्याने होत होती. अखेर आता ‘मुळशी पॅटर्न 2’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

वाळू माफियांच्या वास्तवावर आधारित कथानक

तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट‘ हे या चित्रपटाचे घोषवाक्य असणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, या चित्रपटात राज्यातील वाढत्या वाळू माफियांचे जाळे, त्यामागील अर्थकारण आणि त्याचे सामाजिक परिणाम यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

निर्मितीची धुरा पुनीत बालन स्टुडिओकडे

या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युईन प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे. चित्रपटाची घोषणा युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजीत भोसले आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली.

कलाकार आणि प्रदर्शनाची उत्सुकता

चित्रपटाची घोषणा झाली असली तरी अद्याप कलाकारांची नावे, चित्रीकरणाची तारीख आणि प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न 2’मध्ये कोणते कलाकार झळकणार, कथा कोणत्या दिशेने जाणार आणि चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘मुळशी पॅटर्न’प्रमाणेच सामाजिक वास्तवाला भिडणारा आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट प्रवीण तरडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणणार का, याकडे आता मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now