फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा

By: Editor_Manas

On: Monday, June 1, 2026 5:28 PM

Google News
Follow Us

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. अवैध गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमबाह्य व्यवसायांवर कारवाई केल्यानंतर आता ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींविरोधात कठोर पावले उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अशा जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत राज्यभरात व्यापक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत २८ दुकाने सील करण्यात आली असून ३३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आणि चुकीची माहिती देणाऱ्या जाहिराती प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.

मोठमोठी आश्वासने, अतिशयोक्त दावे आणि खोटे फायदे दाखवून अनेक कंपन्या ग्राहकांना उत्पादन खरेदीस प्रवृत्त करतात. अशा भ्रामक जाहिरातींमुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याने यापुढे त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे. ग्राहक संरक्षणासाठी प्रशासन आक्रमक भूमिका घेणार असून उत्पादन तयार करणारे उत्पादक, जाहिरातदार तसेच ब्रँड अॅम्बेसेडर यांची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे.

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याबरोबरच जाहिरातींच्या माध्यमातून उत्पादने लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या संपूर्ण साखळीची चौकशी करण्यात येणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

२५ मे रोजी स्वीकारला पदभार

शिस्तप्रिय आणि धडाडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा दिला होता. राज्यातील सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना विशेष धाडी आणि जप्ती मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या आदेशानंतर बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाया करण्यात आल्या. भेसळ, अवैध उत्पादन आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमभंग करणाऱ्यांविरोधात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now