‘विस्मा’च्यावतीने साखर व जैवऊर्जेवरील परिषदेचे शनिवारी पुण्यात आयोजन

By: Editor_Manas

On: Friday, May 29, 2026 9:33 AM

Google News
Follow Us

पुणे, मे – वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने येत्या शनिवारी (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विशेष उल्लेखनीय काम केलेल्या साखर कारखान्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या परिषदेचे उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय साखर सहसचिव अश्विनी श्रीवास्तव व राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते हे परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आज विस्माचे महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख, संचालक रोहित नरा आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राऊत यांनी सांगितले की, शनिवारी होत असलेल्या या परिषदेत साखरेबरोबरच व ऊसापासून तयार होणाऱ्या सहपदार्थांची निर्मिती, ग्रीन हायड्रोजनची आवश्यकता, हवाई इंधनावरील संशोधन, शेतकचऱ्यामधून जैव इंधन निर्मिती आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा साखर कारखान्यांमधील उपयोग अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार आहे. यंदाच्या साखर हंगामामध्ये राज्यातील खाजगी १०७ आणि सहकारी १०३ अशा एकूण २१० साखर कारखान्यांनी सुमारे १०३६ लाख टन ऊसाचे गाळप करुन ९८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्यातील सुमारे ५५ टक्के साखर उत्पादन हे खाजगी कारखान्यांकडून होते. केंद्र शासनाकडे साखर निर्यातबंदी उठवण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच शिष्टमंडळासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. यावर सकारात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

विस्माच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र, गुजरात व गोवा येथील सुमारे १३९ खाजगी साखर कारखाने विस्माचे सदस्य आहेत. यामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांना व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या श्रेणीनुसार या परिषदेमध्ये विशेष पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये दालमिया भारत शुगर (कोल्हापूर), जागृती शुगर (लातूर), नॅचरल शुगर (धाराशिव), श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना (दौंड, पुणे), श्री गुरुदत्त शुगर (कोल्हापूर) आणि दौंड शुगर (पुणे) यांचा समावेश आहे. तर वरिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये सर्वश्री शहाजी गायकवाड (दौंड शुगर), संतोष कुंभार (दालमिया भारत शुगर), तुषार निघुते (वेंकटेश्वरा शुगर), वसंत शिंदे (केजीएस शुगर), बी. जी. चव्हाणके (जयवंत शुगर), शशिकांत निगुत (नॅचरल शुगर) आणि शिवाजी शिंदे (सिध्दी शुगर) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now