पुणे, मे 2026 : वर्ल्ड युनिलॅटरल बाय-पोर्टल एंडोस्कोपिक (युबीई) स्पाईन सोसायटी तर्फे भारतीय उपखंड शाखेचे औपचारिक उद्घाटन नुकतेच दक्षिण कोरियामधील सेऊल येथे पार पडलेल्या वर्ल्ड यूबीई वार्षिक परिषदेत करण्यात आले असून,भारत,नेपाळ,श्रीलंका आणि बांग्लादेश येथील मणका विकार तज्ञांना (स्पाईन सर्जन्स) या माध्यमातून एका शैक्षणिक आणि वैद्यकीय व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले आहे.
पुण्यातील प्रख्यात स्पाईन सर्जन आणि संचेती हॉस्पिटल पुणे येथील स्पाईन ॲन्ड न्युरोसायन्स युनिटचे प्रमुख डॉ.शैलेश हदगांवकर यांची नुकतेच कोरिया येथील सेऊलमध्ये झालेल्या वर्ल्ड युबीई स्पाईन परिषदेमध्ये इंडिया चॅप्टरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्ल्ड युबीई स्पाईन सोसायटीचे अध्यक्ष जिऑनफ युन पार्क यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय उपखंडातील एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असून,यामध्ये शैक्षणिक उत्कृष्टता,संशोधन आणि जागतिक सहकार्य यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या शाखेच्या मुख्य नेतृत्व मंडळामध्ये सरसचिव डॉ.केतन देशपांडे,उपाध्यक्ष डॉ.अमोल रेगे आणि कोलकाता येथील मणक्याचे शल्यचिकित्सक व खजिनदार डॉ.अनिंद्या बासू यांचा समावेश आहे.
डॉ. हदगांवकर यांनी सर्व्हायकल स्पाईन एंडोस्कोपी (युबीई ), थोरॅसिक स्पाईन तसेच लंबर स्पाईन युबीई आणि थ्रीडी नेव्हिगेशनसह फ्युजन या क्षेत्रात महत्वाचे कार्य केले आहे. ते आघाडीचे एंडोस्कोपिक (युबीई) स्पाईन सर्जन असून त्यांच्या विस्तृत कार्याबद्दल अनेक संशोधनपर लेख नामांकित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून विविध एंडोस्कोपिक तसेच कॅडेव्हर प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आहेत.या क्षेत्रात त्यांची ओळख एक आघाडीचे नेतृत्व म्हणून आहे.
एक सर्वसमावेशक संघटनात्मक रचना स्थापित करण्यात आली असून यामध्ये कार्यकारी,वैज्ञानिक आणि शैक्षणिक समित्यांचा समावेश आहे. तसेच देशभरातील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 30 कार्यकारी सदस्य यात सहभागी आहेत.
युनिलॅटरल बाय-पोर्टल एंडोस्कोपिक (युबीई) मणक्याची शस्त्रक्रिया ही अत्याधुनिक व कमीत कमी छेद असलेली शस्त्रक्रिया असून,यात मणक्यापर्यंत अचूकपणे पोहचण्यासाठी उच्च दर्जाच्या एंडोस्कोपिक कॅमेऱ्यासाठी आणि दुसरे शस्त्रक्रियेतील उपकरणांसाठी अशा दोन लहान पोर्टल्सचा वापर केला जातो. या एंडोस्कोपिक पध्दतीमुळे शल्यचिकित्सकांना लहान छेदांमधून शस्त्रक्रिया करता येते आणि त्याचवेळी स्क्रीनवर संपूर्ण शस्त्रक्रिया करत असलेल्या भागाचे स्पष्ट दृश्य सतत पाहता येते.यामुळे आसपासचे स्नायू,स्नायूबंध आणि ऊतींना होणारे नुकसान कमी होते. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत मोठे छेद, सखोल विच्छेदन टाळले जाते,रक्तस्त्राव कमी होतो,शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी होतात आणि रूग्ण लवकर बरा होतो,असे डॉ.अमोल रेगे यांनी सांगितले.
डॉ.केतन देशपांडे म्हणाले की,युबीई तंत्राचा वापर मान, पाठीचा मधला भाग आणि कंबरेपर्यंत संपूर्ण मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रभावीपणे करता येतेो. स्लिप डिस्क,स्पायनल स्टेनोसिस,नर्व्ह कॉम्प्रेशन,संसर्ग आणि काही विशिष्ट फ्यूजन प्रक्रियांमध्येही हे तंत्र उपयुक्त ठरत आहे.
डॉ.अनिंद्या बासू म्हणाले की,हे तंत्र एंडोस्कोपीचे फायदे आणि पारंपरिक शस्त्रक्रियेतील उपकरणांची लवचिकता यांचा मिलाफ असल्याने आधुनिक स्पाईन उपचारांमध्ये हेे अधिक बहुपयोगी आणि पसंतीचा पर्याय ठरत आहे. गेल्या दशकात कोरियामध्ये विकसित झालेली ही पध्दत आता जगभरात मोठ्या प्रमाणावर स्विकारली जात आहे.खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर आणि सहज वापरता येणारी असल्याने लहान रूग्णालयांसाठी देखील हे तंत्र उपयुक्त आहे.
डॉ.शैलेश हदगांवकर म्हणाले की,भारतातील मणक्याची शस्त्रक्रिया या क्षेत्रासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या तंत्राचा सुरक्षित आणि प्रभावी वापर करण्यासाठी इंडिया चॅप्टरमार्फत संरचित शैक्षणिक कार्यक्रम,प्रमाणित प्रशिक्षण सत्रे आणि फेलोशिप संधी निर्माण केल्या जाणार आहेत. भारतात अंदाजे 9 ते 10 हजार मणक्याचे शल्यचिकित्सक असून एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाकडे परिवर्तित होणारे तरूण तसेच अनुभवी न्युरोसर्जन आणि आर्थोपेडिक स्पाईन तज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहे.





