प्रतिनिधी – मानस : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला CBI ने अटक केली असून, पुण्यातील विशेष CBI न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे.
दिवसभर चौकशी, त्यानंतर छापेमारी
CBI च्या पथकाने रविवारी दिवसभर मोटेगावकर याची चौकशी केली. चौकशीनंतर लातूरमधील त्याचे कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नसंच, महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली.
तपासात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नसंचातील अनेक प्रश्न 3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे समोर आले. त्यामुळे मोटेगावकर याचा पेपरफुटी प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
दिल्लीत होणार पुढील चौकशी
अटकेनंतर प्रा. मोटेगावकर याला पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची CBI कोठडी सुनावली. पुढील तपासासाठी त्याला दिल्लीतील CBI मुख्यालयात नेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुख्य सूत्रधार म्हणून पी. व्ही. कुलकर्णीचे नाव
या प्रकरणात लातूरमधील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे. कुलकर्णी हा अनेक वर्षे NEET परीक्षेच्या पेपर सेटिंग प्रक्रियेशी संबंधित पॅनेलमध्ये कार्यरत होता. तपासादरम्यान त्याच्याकडून विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न व उत्तरे दिल्याची माहिती समोर आली होती.
CBI च्या मते, कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यातील संपर्काची माहितीही तपासात समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटमध्ये शिक्षण क्षेत्रातील काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
देशभरात छापेमारी, 10 आरोपी अटकेत
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ने आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि इतर शहरांमध्ये छापेमारी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
यापूर्वीही अनेक अटक
या प्रकरणात यापूर्वी पुण्यातील जीवशास्त्र शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे, बिबवेवाडीतील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे आणि राहुरी येथील धनंजय लोखंडे यांना अटक करण्यात आली होती. मनीषा मांढरे हिच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी संभाव्य प्रश्न आणि अचूक उत्तरे सांगितल्याचा आरोप आहे.
परीक्षा रद्द, फेरपरीक्षा जाहीर
NEET-UG 2026 परीक्षा 3 मे रोजी देशभरातील 551 शहरांमध्ये घेण्यात आली होती. मात्र पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली. आता 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





