ऑनलाईन औषध विक्रीविरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद 

By: Editor_Manas

On: Monday, May 18, 2026 10:24 AM

Google News
Follow Us

पुणे : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) दि. 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. देशभरातील सुमारे 12.50 लाख औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे अध्यक्ष संदीप पारख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी संघटनेचे पुणे सेक्रेटरी अनिल बेलकर, खजिनदार रोहित करपे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना पारख म्हणाले,  औषध व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 आणि Rule 1945 अंतर्गत नियंत्रित केला जातो. मात्र ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर तरतूद नसताना देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन विक्री सुरू आहे. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती दिलेली असतानाही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

कोरोना काळात औषधांची होम डिलिव्हरी करण्यासाठी सरकारने तात्पुरती सूट दिली होती. मात्र महामारी संपल्यानंतरही ती मागे घेण्यात आलेली नाही. या परिस्थितीचा फायदा घेत ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती देत बाजारपेठ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे लहान औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

Drug Price Control Order (DPCO) 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित नफा मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत देत असल्याने पारंपरिक औषध विक्रेते स्पर्धेत टिकू शकत नसल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांच्या पर्यायी ब्रँड देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

संघटनेने केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले. महाराष्ट्रात हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now