सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. पण याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्याची परंपराही या कार्यक्रमाने जपली आहे. येत्या भागात ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर उपस्थित राहणार आहे.
या विशेष भागात मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तर्फे मान वंदना देण्यात आली. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील मोहन जोशी आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जेव्हा जेव्हा उद्योगातील ज्येष्ठ कलाकार उपस्थित राहतात, तेव्हा त्यांचा सन्मान करण्याची परंपरा कार्यक्रमाने कायम ठेवली आहे. याच परंपरेचा भाग म्हणून निर्माता-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या वतीने मोहन जोशी यांचा विशेष सत्कार केला. यावेळी हास्यजत्रेची संपूर्ण टीम आणि सर्व कलाकार मंचावर उपस्थित होते. सर्व कलाकारांनी मानाचा मुजरा करत मोहन जोशी यांना अभिवादन केले.
यावेळी भावना व्यक्त करताना मोहन जोशी म्हणाले;
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा एक अल्टिमेट कार्यक्रम आहे. इथले सगळे कलाकार एकापेक्षा एक आहेत. उत्तम कलाकार, उत्तम लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे देखील तितकेच दिग्गज आहेत. हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आणि या कार्यक्रमाला कधीच पर्याय नाही, हे नक्की.”
हास्य, धमाल आणि भावनांनी भरलेला हा विशेष भाग पाहायला विसरू नका — ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, येत्या सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.





