Pune ATS Action: उषाकिरण रुग्णालय बॉम्बप्रकरणाचा उलगडा; आरोपी नागपुरातून एटीएसच्या ताब्यात

By: Editor_Manas

On: Friday, May 15, 2026 8:57 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून अटक केली आहे. आरोपीची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणामागील हेतू, त्याचे संभाव्य साथीदार तसेच इतर ठिकाणी अशाच प्रकारचा कट रचण्यात आला होता का, याचा तपास सुरू आहे.

हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहात टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशामक दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संशयास्पद वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या नळकांड्यांसारखे स्फोटक साहित्य आणि डिजिटल टायमर आढळून आला. त्यानंतर ही सामग्री सुरक्षितरीत्या जप्त करून ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर नेण्यात आली आणि नियंत्रित पद्धतीने निकामी करण्यात आली.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली होती. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान चार नळकांड्या बांधून त्यावर डिजिटल घड्याळासारखे उपकरण लावलेले दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून ती वस्तू बाहेर काढून पोलिसांना कळविण्यात आले.

घटनेची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपी पुण्यातून फरार झाल्यानंतर नागपूरकडे गेल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार नागपूर रेल्वे जंक्शन परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आरोपीचे इतर राज्यांतील किंवा संशयित संघटनांशी काही संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या कलम ४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इलेक्ट्रिक स्कूटर चालक पोलिसांसमोर हजर झाला होता. त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून विविध शक्यतांवरून चौकशी सुरू ठेवली होती. अखेर एटीएसने नागपूरमधून आरोपीला अटक करत या प्रकरणाचा उलगडा केला. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संयुक्तपणे युद्धपातळीवर तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026