सांगली : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक आणि श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांचा खून करण्याचा कट रचून त्यासाठी रेकी करणार्या तिघांना चार जिवंत काडतूस व दोन देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली. या टोळीतील एक संशयित फरार असून अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे सांगली, मिरजेत खळबळ माजली आहे.
याबाबत श्रीमती बारवकर यांनी माहिती देताना सांगितले, श्री.भोकरे यांच्या हत्येचा कट रचणार्या गणेश चंद्रकांत लोखंडे (वय ३३, रा. हरिपुर रोड, सांगली), विराज प्रकाश बुटाले (वय ४१, रा. आंबेडकर रोड, सांगली) आणि संग्राम संभाजी फडतरे, (वय २७, रा. पाटणे प्लॉट, हरिपुर रोड) यांना अटक करण्यात आली आहे, तर यातील एक संशयित फरार आहे.या टोळीची भोकरे यांचा खून करण्याची योजना होती. यासाठी ते अंंकली ते काळीवाट रस्त्यावर मारूती मोटारीत (एमएच १० एबी ५९३५) एकत्र आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथकाला मिळाली. या माहितीनुसार पथकाने घटनास्थळी जाउन तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे, एक चाकू अशी घातक हत्यारे मिळाली.
एसबीजीआय अभियांत्रिकी महाविद्य।लयाजवळील जमिन चौथा संशयित सचिन आवळे आणि सहहिस्सेदार यांच्या मालकीची असून या जमिनीवर भोकरे यांचा कब्जा आहे. यामुळे भोकरे यांचा खून केला तर जमिन ताब्यात घेता येईल आणि या बदल्यात मोबदला देतो असे आवळे यांनी सांगितले होते. यामुळे भोकरे यांचा खून करण्याची योजना आखली होती. यासाठी लोखंडे व फडतरे या दोघांनी सोनभद्र उत्तरप्रदेशमधून दोन देशी बनावटीची पिस्तुले व काडतुसे फेबुवारीमध्ये खरेदी केली होती.
भोकरे हे दैनिक जनप्रवास कार्यालयात कधी येतात, याची माहिती काढून संधी मिळताच त्यांचा खून करण्याची योजना आखण्यात आली होती. अशी कबुली संशयित बुटाले यांने पोलीसांना दिली असल्याचे अप्पर अधिक्षक श्रीमती बारवकर यांनी दिली. गुन्हा करताना वाहनाची ओळख होउ नये यासाठी नकली नंबर लावण्यात आला होता.या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार संदीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार अवैध शस्त्र बाळगणे, हत्येचा कट रचने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने अधिक तपासासाठी सोमवार दि. ११ मे अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, याबाबत श्री. भोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, वादग्रस्त जमिन संस्थेची असून मालकीहक्काबाबत न्यायालयात खटला चालू आहे. या मागील मूख्य सूत्रधाराचा पोलीसांनी शोध घेउन त्याच्यावर कठोर कारवाई करावी.





