आज राज्यात एकामागोमाग एक ५ भीषण रस्ते अपघात घडले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील इचलकरंजी, भंडारा, परभणी, पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात झालेल्या अपघातांत एकूण ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. तर अनेक जण जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावर रुई फाटा येथे एक दुर्दैवी घटना घडली. सुशांत शंकर कांबळे हा गडहिंग्लज तालुक्यातील कडगावमध्ये राहणारा तरुण धार्मिक कार्यासाठी ज्योत आणण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कडगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर बेला गावाजवळ रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर पोलीस मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. यामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले होते.
परभणीच्या उमरी फाटा शिवारात तीन मोटारसायकली एकमेकांना धडकल्याने मोठा अपघात झाला. यावेळी तिन्हीही दुचाकीस्वारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात सिद्धार्थ पितांबरे गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अन्य दोन जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
पुण्यात निवडणूक कामाच्या दबावात प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू
पुणे शहरात एका प्राध्यापकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. ज्ञानेश्वर रोटे (४०) हे बीएलओ म्हणून काम करत होते. उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलावलेल्या बैठकीला जाताना धानोरी-लोहगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कामाच्या दडपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटे ४ च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उभ्या ट्रेलरला मागून धडकली. यात चालक दीपक पटेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुजय पाटील, राज चिले, सुगम जयस्वाल आणि स्नेहल उसेकर हे चौघे जखमी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात कारने ट्रकला मागून धडक दिली. धडकेनंतर कार १०० फूट फरफटत गेली. काही वेळातच कारने पेट घेतला. यात आणि पवन अजमेरा या चालकाचा जिवंत जळून मृत्यू झाला. कारमधील ईशा आणि विना अजमेरा हे दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व अपघातांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून सध्या पुढील तपास सुरू आहे.





