पुणे : Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महिलांना आणखी एक संधी दिली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसीची अंतिम मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली.
यापूर्वी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे केवायसी अपूर्ण राहिल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र हा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती.
या पार्श्वभूमीवर सरकारने “शेवटची संधी” म्हणून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी 30 एप्रिलपूर्वी ते पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा योजनेचा लाभ थांबण्याची शक्यता आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील आणि डिजिटल सुविधांपासून दूर असलेल्या महिलांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. शासनाने सर्व लाभार्थींना ही संधी न गमावण्याचे आवाहन केले आहे.





