नवी दिल्ली : तारीख 28 फेब्रुवारी 2024… एका 30 वर्षीय महिलेने पोलिसांना फोन लावला. सांगितलं की, सर मी माझ्या लिव-इन-पार्टनरची हत्या केलीय. तुम्ही इथे येऊन मला अटक करा. फोनवरुन हे ऐकल्यानंतर पोलिसांना वाटलं की, कोणी चेष्टा करतय. पण, तरीही खातरजमा करण्यासाठी काही पोलीस महिलेने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले.
अपार्टमेंटमध्ये पाऊल ठेवताच पोलीस हादरले. महिलेने जे काही सांगितलेलं, ते सगळ खरं होतं. ती महिला कोण होती? तिने हे हत्याकांड का केलं? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दमदम भागात ही धक्कादायक घटना घडली.
30 वर्षांची संहती पाल, पेशाने मेकअप आर्टिस्ट आणि एका मुलाची आई आहे. संहतीने नवऱ्यापासून घटस्फोट घेतलाय. घटस्फोटानंतर संहतीच्या आयुष्यात सार्थक दासची एन्ट्री झाली. 30 वर्षाचा सार्थक पेशाने फोटोग्राफर आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी एकत्र रहाण्याचा निर्णय घेतला. दमदम भागात संहती सार्थक आणि आपल्या मुलासोबत राहत होती. पण मागच्या काही दिवसांपासून संहती आणि सार्थकमध्ये सर्वकाही व्यवस्थित नव्हतं. त्यांच्यात वादविवाद सुरु होते.
सार्थकला असं अजिबात वाटलं नाही की, हे मतभेद एकदिवस त्याच्या जीवावर बेततील. बुधवारी संहतीने सार्थकची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वत:च पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी सार्थकचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
शरीरावर चाकूने वार केल्याचे अनेक निशाण होते. मृतदेहाच्या शेजारी चाकू पडलेला. त्याच चाकूने त्याची हत्या करण्यात आली. संहती तिथेच बसलेली होती. एक खूप नॉर्मल वाटत होती, जसं काही घडलच नाही.
पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला. संहतीला अटक केली. संहतीने आपणहूनच गुन्हा कबूल केला. पण सार्थकची हत्या का केली? त्यामागे नेमक काय कारण आहे? ते अजून संहतीने स्पष्ट केलेलं नाहीय.