BIG NEWS : अजितदादांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला होता; रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप
महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात कॅप्टन अशोक खरात या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली. यानंतर कॅप्टन अशोक खरात आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातसाठी छत्री धरताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोत त्याची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. यावरुन गदारोळ माजल्यानंतर रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या गोष्टी घडल्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. तसंच काही धक्कादायक दावेही केले आहेत.
मी पक्षातली आहे म्हणून आरोप करत नाही. मी वकील म्हणून हे सगळे आरोप करते आहे. कारण चाकणकर या भोंदूबाबा अशोक खरातच्या सेक्स रॅकेटच्या त्या मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यानुसार जो तपास समोर आला आहे त्यानुसार ही मागणी करते आहे की रुपाली चाकणकरांना अटक करावी. कारण चाकणकरांना सगळं माहीत असून त्यांनी दडपशाही केली. अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कँडल आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर मुख्य आरोपीशी संगनमत साधून हे सगळं करत होत्या. त्यामुळे रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे.]
अशोक खरातला दोन मुलं ब्लॅकमेल करत होती. पुण्यात ती दोन मुलं आली होती त्यांच्याबाबतही तडजोड करण्यात आली. पोलिसांनाही सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. मी दोन दिवसांत सामाजिक कार्यकर्त्यांचं नाव जाहीर करणार आहे. एसआयटीने जर नाव जाहीर केलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन रिट याचिका दाखल करणार आहे. देवाभाऊंवर मला विश्वास आहे ज्या कुणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाही याची खात्री मला आहे. अनेक महिलांनी अनेक तक्रारी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे येत होत्या, अशोक खरातच्या तक्रारी करत होत्या. पण संविधानिक पदाचा वापर करुन चाकणकर यांनी दडपशाही केली असाही आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामुळे त्यांनी हे धक्कादायक आरोप केले आहेत.
रुपाली चाकणकर यांनी छत्री धरल्याचा फोटो आहे, पाद्यपूजन करत आहेत तो फोटो आहे. गुरुमाऊलीच्या विरोधात आलेला वर्षभरापूर्वीचा गुन्हा चाकणकर यांनी का दडपला? त्यांना अशोक खरातच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. भोंदूबाबाला त्यांनी सांगितलं होतं की तू काहीही कर मी पदावर बसले आहे. त्यामुळेच भोंदूबाबाने महिलांवर अत्याचार केले. राज्य महिला आयोग चाकणकरांच्या काळात अशोक खरातच चालवत होता. नीट सगळ्या घटना पाहिल्या तर ही बाब लक्षात येईल असंही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
रूपाली ठोंबरे यांनी पुढे असंही म्हटलंय की, सर्व ‘कटू सत्य’ अजितदादांना माहित होतं. अजित दादांनी चाकणकर यांचा राजीनामा आधीच मागितला होता. जेव्हा अजित दादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला, असा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला आहे. अजित दादा आज आपल्यात नाहीत, पण जर ते असते तर त्यांनी या लोकांना ‘छडीच्या तालावर’ सरळ केले असते, असे त्या संतापून म्हणाल्या. अजित दादांना त्यांच्या शेवटच्या काळात कोणी कोणी आणि कशा प्रकारे घेरले होते, ते कोणामुळे वैतागले होते, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या काळात नावानिशी जाहीर करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. जे दादांना जिवंत असताना करता आले नाही, ते त्यांनी ‘वर’ गेल्यावर या भोंदू बाबाच्या माध्यमातून जगासमोर आणले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणाला आणि घडलेल्या घटनांना पूर्णपणे रुपाली चाकणकर मॅडम याच जबाबदार आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.





