बाथरूममध्ये इलेक्ट्रिक टूथब्रशचा स्फोट; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना
न्यूयॉर्कमधील घटनेने उडाली खळबळ
सोलापूर/न्यूयॉर्क : मोबाईल किंवा इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना अनेकदा समोर येतात; मात्र आता इलेक्ट्रिक टूथब्रशचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यूयॉर्कमधील ३३ वर्षीय महिलेच्या बाथरूममध्ये हा प्रकार घडला असून, यात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
नेमकी घटना काय?
शार्लोट बोवर्स या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या आठ महिन्यांपासून संबंधित इलेक्ट्रिक टूथब्रश वापरत होती. घटनेच्या रात्री ती आणि तिचा जोडीदार झोपलेले असताना अचानक बाथरूममध्ये ठेवलेल्या ब्रशचा स्फोट झाला आणि त्यातून आग लागली.
सुदैवाने, ब्रशजवळ असलेल्या काचेच्या स्टील फ्रेममुळे आग पसरली नाही. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, असे तिने सांगितले.
बाथरूमचे मोठे नुकसान
या घटनेमुळे बाथरूममध्ये काळा धूर पसरला आणि आगीच्या ज्वाला भिंतीपर्यंत पोहोचल्या. यामध्ये एक्झॉस्ट फॅनचे नुकसान झाले असून, घरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. धुरामुळे भिंतींचे नुकसान झाल्याने दुरुस्ती आणि रंगकामासाठी सुमारे २६७ डॉलर्स (सुमारे २२ हजार रुपये) खर्च करावा लागला.
कंपनीकडून मर्यादित प्रतिसाद
घटनेनंतर महिलेने कंपनीकडे तक्रार केली असता, कंपनीने केवळ नवीन टूथब्रश खरेदीसाठी ४६ डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली. मात्र, महिलेने दुरुस्तीचा खर्च मिळावा, अशी मागणी केली आहे.
वापरकर्त्यांसाठी इशारा
विशेष म्हणजे, स्फोटाच्या वेळी टूथब्रश चार्जिंगला जोडलेला नव्हता आणि तो पूर्णपणे कोरडा होता. या घटनेनंतर “मी आता कधीही इलेक्ट्रिक टूथब्रश वापरणार नाही,” अशी प्रतिक्रिया महिलेने दिली आहे.
या प्रकारामुळे इलेक्ट्रिक उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, वापरकर्त्यांनी अशा उपकरणांचा वापर करताना अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.




