बीड : जिल्ह्याच्या केज (Beed) तालुक्यातील पिंपळनेर येथे अल्पवयीन महिलेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून कारवाईला वेग आला आहे.
बीडमधील या घटनेची महिला आयोगानेही दखल घेतली असून फिर्यादी महिलेचे अल्पवयातच लग्न झाल्याने रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी गावच्या पोलीस पाटील आणि ग्रामसेवकावरही कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आता कारवाईला वेग आला असून पीडित महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यातील पिंपळनेर येथे 10 मार्च धक्कादायक घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले.
त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार करुन एका खांबाला बांधल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर, महिला आयोगानेही याची दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांस दिले होते.
पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहितेवर अत्याचार करुन गावातील चावडीला असलेल्या खांबाला बांधून ठेवल्याच्या घटनेत मोठी घडामोड झाली असून सदरील विवाहितेचा बालवयात विवाह झाला होता, हे तिने पोलीस फिर्यादीत दिलेल्या जबाबातून समोर आले. त्यानुसार, आता तिच्या पतीसह आई-वडील व सासू-सासरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हा बालविवाह होत असताना कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणात गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.





