Jalgaon Crime : दरमहा 20 हजार पोटगी टाळण्यासाठी नवऱ्याचा कट; पत्नीला संपवण्यासाठी दोन लाखांचा सौदा, घराला आगच लावली
जळगाव : कोर्टाने पत्नीला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिल्यानंतर पतीने पत्नीला संपवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याच्या सणसणाटी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पीडित महिलेचा पतीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोटगी टाळण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एका आरोपीला अटक केली असून त्यांच्याकडून नऊ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या घटनेत फिर्यादी किरण उमेश राऊळ आणि त्यांची आई नगरदेवळा येथील घरी झोपलेल्या असताना दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोर्टाच्या आदेशामुळे पतीला पोटगी द्यावी लागणार असल्याने त्याने हा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले.
एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने हा गुन्हा फिर्यादीचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. राहुल पाटील आणि त्याची पत्नी किरण राऊळ यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असून कोर्टाने राहुलला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते.
त्या रागातून राहुलने पत्नीला धडा शिकवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते.
दरम्यान, आरोपी गणेश पाटील याच्याकडून केवळ जाळपोळच नव्हे तर महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोटरसायकल चोरी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून पाचोरा, जळगाव एमआयडीसी, भोकरदन, शेगाव रेल्वे, बोदवड तसेच सुरत येथील एकूण नऊ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.









