PMC Elections | पुण्यात भाजप–शिंदेसेना युतीला खिंडार; शिंदे गट स्वबळावर मैदानात उतरणार

PMC Elections | पुण्यात भाजप–शिंदेसेना युतीला खिंडार; शिंदे गट स्वबळावर मैदानात उतरणार

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदेसेना युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावामुळे पुण्यात ही युती अखेर तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून शिंदेसेनेला १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु शिंदेसेना २५ जागांवर ठाम राहिल्याने चर्चेला यश आले नाही.

जागावाटपाबाबत ठोस उत्तर न मिळाल्याने शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील युती तुटल्याची घोषणा करण्यात आली असून, शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पुण्यातील सर्व १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.

या बैठकीनंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला. बैठकीतून रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे बाहेर पडले. सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती नाना भानगिरे यांनी दिली. पुण्यातील १६५ही जागांवर उमेदवारी देण्याची तयारी शिंदेसेनेने सुरू केली आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. भाजप–शिंदेसेना युतीबाबतही आधी सकारात्मक संकेत होते; मात्र शिंदे गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र, त्या चर्चेतूनही युतीसाठी हिरवा कंदील मिळाला नाही. अखेर शिंदेसेना पुण्यात स्वबळावर लढणार असल्याचे निश्चित झाले.

दरम्यान, पुण्यातील एका खाजगी हॉटेलमध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित आहेत. थोड्याच वेळात राज्याचे मंत्री **उदय सामंत**ही या बैठकीत सहभागी होणार असल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.