विशाल भालेराव
सिंहगड- : नांदेड सिटी पोलीसांची चाणाक्षपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका अल्पवयीन तरुणाच्या सिगारेटमधून निघणाऱ्या धुराच्या वासावरून त्यात गांजा असल्याचे ओळखण्याइतपत पोलीस सतर्क आहेत; मात्र खडकवासला परिसरात राजरोसपणे सुरू असलेली गांजा विक्री त्यांना का दिसत नाही, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
खडकवासला परिसरात एका ठिकाणी अल्पवयीन मुलगा सिगारेट ओढत असताना नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी जवळच उभा होता. तरुणाने तोंडातून धूर सोडताच संबंधित कर्मचाऱ्याने ‘गंध’ ओळखत सिगारेटमध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर त्या तरुणाला केवळ ‘कडक समज’ देण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
यावेळी संतप्त नागरिकांनी थेट पोलिसांनाच जाब विचारला. “साहेब, मुलांनी गांजा ओढणे चुकीचेच आहे; पण हा गांजा येतो कुठून? हे तुम्हाला माहिती नाही का? संपूर्ण पुण्याला माहित आहे खडकवासला परिसरात गांजा कुठे आणि कसा मिळतो. मग कारवाई तिथे का होत नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
या घटनेमुळे खडकवासला व परिसरातील भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अल्पवयीन मुले सर्रास गांजाच्या नशेत अडकत असून यामुळे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. गांजा कुठे विकला जातो, कोण विक्रेते आहेत, कोणते रॅकेट कार्यरत आहे आणि कोणाच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू आहे, याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. मात्र तरीही ठोस कारवाई होत नसल्याने पोलीसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“कारवाई केली तर काय मिळणार? रतीब बंद झाला तर काय करायचं?” असे प्रश्नच कदाचित पोलिसांसमोर असावेत, अशी जहरी टीकाही नागरिकांतून होत आहे. गांजाच्या व्यापारावर हात टाकण्याऐवजी फक्त धुराचा वास घेऊन कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान मानले जात असल्याचा आरोप होत आहे.
नांदेड सिटी पोलीस तसेच पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने किमान एकदा तरी आपण पोलीस आहोत आणि यासाठी सरकारी पगार घेतो याची जाणीव ठेवून कारवाई करावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा खडकवासला परिसरातील तरुण पिढी गांजाच्या विळख्यात सापडत जाणार, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.









