येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार? बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षांपासून सतत अस्थिरतेच्या छायेत आहे. आता पुन्हा एकदा राज्यात मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. सरकारमध्ये मोठे बदल होणार असून येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा बदलू शकतो, असा खळबळजनक दावा एका बड्या नेत्याने केला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढती जवळीक, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट, त्यानंतर शिंदेंचा दिल्ली दौरा आणि महायुतीतील अंतर्गत वाद पाहता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना महत्त्व प्राप्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधातच निवडणूक लढले. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फैरी झडल्या.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर महापालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गटाने एकत्र लढण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा करत येत्या दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे विधान केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंच्या राजकीय ताकदीवर भाष्य करताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपली ‘पॉवर’ दाखवून दिली आहे. भाजप महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगत होती, मात्र शिंदेंच्या अमित शाह यांच्याशी भेटीनंतर भाजपने युटर्न घेत युतीत निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला. “एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातले आहे, हीच त्यांची किमया आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न केल्याचा हा बदला असू शकतो, असेही आंबेडकर यांनी सूचित केले. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांत शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा आपला अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शरद पवार हे चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्यातून योग्य संदेश गेला आहे. आता खेळ सुरू झाला असून एनडीएमध्ये पुढे आणखी काय घडते, हे पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल,” असे सूचक विधानही प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीतच लढण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.