बीडीओचा वचक राहीला नाही । बीडीओना सांगा मी भित नाही ही कसली सेवा देणाऱ्या ग्रामसेवकांची भाषा
विशाल भालेराव
गोहे बुद्रुक : गावाच्या ग्रामपंचायतीत प्रलंबित कामे, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि नागरिकांशी उर्मट भाषेत वागणूक या सर्व प्रकरणांनी गोहे बुद्रुक ग्रामपंचायत सध्या चर्चेत आहे. ग्रामस्थांनी ग्रामसेवकांवर गंभीर आरोप करत संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे. “ही सेवा देणाऱ्यांची भाषा का? बीडीओचा वचकच राहिला नाही का?” असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीत सातत्याने होत असलेल्या विलंब, अधिकारी-कर्मचारी यांची बेपर्वाई आणि पगार ग्रामपंचायतीचा घेत असताना बाहेरच्या कामांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रखर नाराजी व्यक्त केली. कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर राहिल्याने प्रमाणपत्रे, कर वसुली, योजना अर्ज व मूलभूत कामे अडकून पडत असल्याचा आरोप करण्यात आला.
याचसोबत ग्रामसेवकांच्या उर्मट भाषेबद्दलही नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. “घाबरत नाही” अशा शब्दांत नागरिकांशी बोलणे ही प्रशासनाची शैली असू शकत नाही, अशी टीका ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे बीडीओ कार्यालयाने तातडीने लक्ष घालून संबंधित ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी पुढे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचीही भूमिका प्रश्नांकित केली आहे. “ग्रामपंचायत कारभार ढिसाळ झाला असेल तर जबाबदार कोण? दोषी सापडल्यास पदभेद न करता कारवाई व्हावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात होत असलेल्या अनियमिततेमुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर गावपातळीवर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.









