Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सध्या मोठी चर्चा सुरु आहे. लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेला गती मिळाल्याने अनेक महिलांचे अर्ज बाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 30,000 पेक्षा अधिक महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 6,40,879 महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, विभागाकडून झालेल्या तपासणीत विविध कारणांमुळे 30,304 महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे. याशिवाय 390 महिलांनी स्वतःहून लाभ बंद करण्याची विनंती केल्याने त्यांचाही लाभ थांबवण्यात आला आहे. पात्र महिलांनी तातडीने ई-केवायसी करावी, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अर्ज बाद होत आहेत. अनेक महिला या योजनेतील पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळले असून लाखो अर्जांवर गंडांतर आले आहे. ई-केवायसी प्रक्रियेतून फक्त खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच योजना मिळणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विधानसभेत बोलताना आमदार आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला 2 कोटी 63 लाख 83 हजार 589 अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 43 लाख 82 हजार 936 अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र, पडताळणीत मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले आहेत. काही शासकीय कर्मचारी महिलांनीदेखील चुकीने या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
एकूणच, लाडकी बहीण योजनेच्या कठोर पडताळणीमुळे अपात्र लाभार्थ्यांना बाहेर काढले जात असून पात्र महिलांनी ई-केवायसी करून आपला लाभ कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









