Pune Jain Boarding : गोखले बिल्डर्सने जैन बोर्डिंग जमीन व्यवहार मागे घेतला असला तरी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर हे प्रकरणाचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. या व्यवहारातील अनियमिततेबाबत ते लवकरच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. एवढ्या मोठ्या जागेचा सौदा नेमका कोणी केला, याची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. गुरुवारी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
धंगेकर म्हणाले, “धर्मादाय आयुक्त, बिल्डर आणि काही राजकारण्यांचे संबंध काय आहेत, याची चौकशी झालीच पाहिजे. धर्मादाय आयुक्तालयात प्रकरणे वर्षानुवर्षे रखडून राहतात; मग या वेळी इतक्या घाईघाईने निर्णय कसा झाला?” ते पुढे म्हणाले, “मी पोलीस तक्रारीत कोणाचे नाव लिहिणार नाही. पण व्यवहारात कोण कोण सहभागी होते, हे जाणून घ्यायचे असेल तर गोखलेंना विचारा. धर्मादाय आयुक्त एवढ्या वेगात निर्णय देणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे.”
यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी परिस्थितीवरही भाष्य केले. “शिंदे साहेब म्हणाले म्हणून थोडं थांबलो आहे; पण पोलखोल तर व्हायलाच हवी. निलेश घायवळ, रुपेश मारणे प्रकरणावरही मी पुढे बोलेन. पुण्यात तब्बल 70 टोळ्या सक्रिय आहेत. हा विषय शिंदे किंवा फडणवीसांचा नाही; ही गंभीर कायदा–सुव्यवस्थेची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत धंगेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, “मला राजकारणात माझ्यासारखा मर्द भेटलाच नाही. त्यांच्या औकातीवर मी नंतर बोलेन; काही दिवसात सगळ्यांची औकात दाखवतो. काहीजण माझ्या तोलाच्या पलीकडे जाऊन बोलतात.”
ते पुढे म्हणाले, “मी कुणाच्या कुटुंबीयांवर बोलत नाही; मला योग्य संस्कार मिळाले आहेत. सत्ता ही जनतेसाठी असते, पण काहीजण मात्र सत्ता घरात कशी आणता येईल याचाच विचार करतात. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो; त्यांना जनतेची जाण आहे.”









