पुणे: शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि नवउद्यमशीलतेच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय योगदान देणारे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना दैनिक आरंभपर्वतर्फे पहिला ‘आरंभरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विश्वास आरोटे, ‘आरंभ पर्व’च्या मुख्य संपादिका सुरेखा सावंत, संपादक प्रतीक गंगणे आदी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून, व्यक्तिमत्त्व घडविण्याची शक्ती आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची, राष्ट्राप्रती प्रेम भावाची आणि उद्यमशीलतेची जाणीव निर्माण करण्यावर, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासावर सूर्यदत्त संस्थेने आरंभापासून भर दिला आहे. ‘आरंभ पर्व’सारख्या माध्यमांनी ग्रामीण भागातील प्रतिभेला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ देण्याचे केलेले काम अत्यंत प्रेरणादायी आहे.”

या कार्यक्रमाला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सुधाकरराव जाधवर, उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व नानजीभाई ठक्कर, तसेच स्विफ्ट डिटेक्टिव अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका प्रिया काकडे या मान्यवरांनी उपस्थित राहून विविध पुरस्कार्थ्यांचा सन्मान केला. प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मयुरी नव्हाते, तसेच अभिनेता व युवा उद्योजक ओम यादव, माजी उपमहापौर ॲड. प्रसन्न जगताप, काकासाहेब चव्हाण, भूपेंद्र मोरे, बाप्पूसाहेब पोकळे, रूपेश घुले आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत उपस्थितांना प्रोत्साहित केले. तसेच पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रतीक गंगणे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा मते यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन निवासी संपादक लक्ष्मण साबळे, मार्केटिंग हेड अभिषेक मरगळे, आणि पुणे शहर पत्रकार महेश वरवटे यांनी केले. राज शिनारे यांनी सूत्रसंचालन केले.







