Satara Crime : चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ

Satara Crime | फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र आणि फलटण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. तपासासंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू झाली होती. या चौकशीमुळे त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. अखेर, या तणावाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” असा इशारा दिला होता. मात्र, या गंभीर तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी फलटणमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. मृत्यूपूर्वी डॉक्टरने आपल्या हातावर आत्महत्येचे कारण लिहून ठेवले असल्याचे समोर आले आहे. त्यात त्यांनी “PSI गोपालने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक त्रास दिला” असा मजकूर लिहिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “घटनेचे कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. मात्र मी पोलिस अधिक्षकांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. सुसाईड नोट किंवा इतर पुरावे आढळले असतील तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. दोषी कोणताही असो, त्याला सोडले जाणार नाही. कठोर कारवाई होईल.”

दरम्यान, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आणि पोलीस स्वतः तपास करणार असल्याचे सांगितले आहे.